सासवड रस्त्यावरील तेलाच्या गोदामासह चार गोदाम जाळून खाक, तेल पसरल्याने आगीने केले रौद्ररूप धारण

सासवड रस्त्यावरील वडकी गावात खाद्यतेलाच्या गोदामासह शेजारील तीन गोदामाला काल मध्यरात्री रात्री उशिरा लागलेल्या आगीत चारही गोदामे जळून खाक झाली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

वडकी गावात असलेल्या तेलाच्या गोदामाला शनिवारी (दि.15) रात्री उशिरा आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरुवातीला तीन अग्निशमन दलाच्या गाड्या वडकीत घटनास्थळी पोहचल्या. तेलाच्या गोदामातील आग इतरत्र पसरू नये म्हणून फोमद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग काही केल्या नियंत्रणात येत नव्हती.

जवान फोमबरोबरच पाण्याचा माराही आगीवर सुरू होता. गोदामात 500 ते 600 टन तेलाचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याशेजारीच वायरींचे गोदाम असल्यामुळे आगीने तेथेही पेट घेतला होता. दोन गोदामावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात शेजारील वैद्यकीय साहित्याच्या गोदामाला आग लागली होती. रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कुलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमआरडीएच्या पाच गाड्या, अग्निशमन दलाच्या दोन त्याशिवाय दोन पाण्याचे टँकर याच्या मदतीने आग विझविण्यात आली. 50 हुन अधिक जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

आगीत जीवितहानी झाली नाही
आगीत चारही गोदामे जळून खाक झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आगीत जीवितहानी झालेली नाही.
– राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या