लोणावळा घाटात चार कि.मी.चा बोगदा खणणार!

1954

सातत्याने दरडी कोसळल्याने तसेच अतिवृष्टीने भूस्खलन होत असल्याने गेले काही दिवसांपासून ठप्प झालेल्या मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक निर्धोक करण्यासाठी येथे चार किलोमीटरचा नवा बोगदा बांधण्यात येणार आहे.

जुलैच्या सुरुवातीला आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने कर्जत-लोणावळा घाट सेक्शनमध्ये मंकी हिल ते विठ्ठलवाडीदरम्यान नऊ ठिकाणी दरड कोसळून ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दरडींसोबत ट्रकवर मातीही कोसळत आहे. अशा प्रकारे ट्रकवर पडलेला 1500 क्युबिक मीटर चिखल-मातीचा ढीग मध्य रेल्वेच्या इंजिनीअर्सनी काढला आहे. त्यामुळे यंदा उद्भवलेल्या नैसर्गिक संकटात दक्षिण-पूर्ण घाट सेक्शनमध्ये उपाय योजण्यासाठी मध्य रेल्वे बोगद्याच्या डिझाईनचे तज्ञ, जिओलॉजीतील तज्ञ, कोकण रेल्वे, आरडीएसओ रेल्वे बोर्डाचे माजी अभियांत्रिकी सदस्य सुबोध जैन यांना पाचारण केले होते.

या सर्वांना या भौगोलिक परिस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना सुचविण्यासाठी मध्य रेल्वेने तज्ञांना पाचारण केल्यानंतर त्यांनी विविध पर्याय सुचविले आहेत. मध्य रेल्वेने आधी ठाकूरवाडी ते मंकी हिल परिसरात चार ठिकाणी छोटे ‘टनेल पोर्टल’ (छोटे बोगदे) बांधले होते. तसेच काही ठिकाणी केनेडियन फेन्सिंग (जाळी) उभारली होती.

कायमस्वरूपी योजना

या भागातील दरडी जास्त कोसळणार्‍या नऊ ठिकाणांची यादी केली आहे. त्यावर उपाय योजण्यासाठीच तज्ञांना बोलावले होते; परंतु कायमस्वरूपी तोडगा काढायचा तर येथे चार किलोमीटर नवा बोगदा खणावा लागेल. त्यासाठी खर्चही मोठा असला तरी त्यावाचून पर्याय नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले.

20 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे सुरू

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील मालगाडीची मिडल लाइन सुरू झाली आहे. 16 ऑगस्टपर्यंत दुसरी लाइन, तर 20 ऑगस्टपर्यंत संपूर्ण मार्ग सुरळीत होणार असला तरी येथे दर ताशी 30 कि.मी. वेगाचे निर्बंध गाडय़ांवर टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या