नगर-मनमाड महामार्गाचे चौपदरीकरण होणार तरी कधी? संतप्त प्रवाशांचा सवाल; शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

नगर- मनमाड महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे आजवर अनेक अपघात झाले असून, हा महामार्ग निरपराध प्रवाशांच्या जिवाचा कर्दनकाळ ठरला आहे. या रस्त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेकडो व्यक्तींचे कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेला व राज्यकर्त्यांना याचे फारसे सोयरसुतक दिसत नाही.

साधारणपणे 1990 साली नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचे सुमारे तीनशे कोटींचे टेंडर ऑस्ट्रेलियातील एका कंपनीला देण्यात आले; परंतु काम सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून हे काम काढून घेत मेहता ऍण्ड मेहता कंपनीला देण्यात आले. त्यांनी जळगाव येथील एका कंपनीला हे काम दिले. मात्र, त्यांच्याही आवाक्याबाहेर हे काम गेल्याने त्यांनी स्थानिक रस्ते बांधकाम व्यावसायिकांना तुकडय़ा-तुकडय़ात वाटून दिले. त्यामुळे रस्ता पूर्ण व्हायला तीन ते चार वर्षे लागली. रस्ता पूर्ण होईपर्यंत निम्मा रस्ता उखडला होता.

या रस्त्यावरून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. दक्षिण हिंदुस्थानात जाण्यासाठी त्यांना हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. याच मार्गावरून जिह्यातील 17 साखर कारखान्यांची उसाची वाहतूक केली जाते. रस्त्यालगत असणाऱया राहुरी, संगमनेर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येवला, मनमाड व नगर तालुक्यातील वाहनांची वर्दळ याच मार्गावरून आहे. शिर्डी व शनिशिंगणापूर ही आंतरराष्ट्रीय देवस्थाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण याच मार्गावर आहेत. यामुळे या महामार्गावर नेहमीच वाहनांच्या गर्दीचा महापूर असतो.

दोन वर्षांपूर्वी विळद घाटापासून या रस्त्याचे नव्याने काम सुरू झाले. हे काम चांगल्याप्रकारे सुरू असतानाच अचानक बंद पडले. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यात पाणी साचले. वाहतुकीची वर्दळ सुरू असल्याने पाणी साचलेले लहान खड्डे प्रचंड मोठे झाले आणि हेच खड्डे पुढे चालून जीवघेणे ठरले. आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आता पुन्हा रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच अवजड वाहतूक या रस्त्यावरून सुरू असल्याने अपघात नित्याचेच झाले असून, रोज किंवा दिवसाआड अपघात होत आहेत व निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही मालिका कधी संपणार? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

काम होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी

महामार्ग दुरुस्त होण्यासाठी अनेकदा आंदोलन झाली, रास्ता रोको झाला; परंतु प्रत्येकवेळी ठोस निर्णय न होता तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची समज काढण्याचे काम संबंधितांनी केले. आता नव्याने या रस्त्याच्या कामासाठी 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, जानेवारीमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.