बिहारमध्ये पुन्हा हिंसाचार, दोन गटांत गोळीबार; चार ठार

रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवरून बिहारमध्ये शुक्रवारी उसळलेला हिंसाचार आज पुन्हा एकदा उफाळून आला. नालंदा येथे दोन गटांत गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये चार जण ठार झाले आहेत. त्यामुळे नालंदामध्ये कलम 144 लागू केले असून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर सासाराम येथेही हिंसाचाराची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

नालंदा येथे शुक्रवारी ज्या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली होती तेथून नजीकच आज हिंसाचार झाला. यावेळी जमावाने 30 राऊंड फायर केल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ धरपकड सुरू केली. तेव्हा संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती बीडीओ अंजन दत्ता यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत रोहतास, नालंदा, भागलपूर आणि गया जिह्यातील 61 जणांना अटक केली आहे.

मुंगेरमध्येही दगडफेक

मुंगेरमध्ये आज मूर्ती विसर्जनावरून झालेल्या वादामुळे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच जमावाने पोलिसांच्या गाडीचीही तोडपह्ड केल्याचे समोर आले आहे.