लग्नाहून परत येताना अपघात, दोन दुर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू

125

भरत काळे/ विजय जोशी

राज्यामध्ये झालेल्या दोन रस्ते अपघातात शनिवारी एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमधील समानता ही आहे की लग्न आटोपून घरी परत येत असताना हे दोन्ही अपघात झाले आहेत. पाचोऱ्याजवळ झालेल्या अपघातात ५ जणांचा तर मुखेड-उदगीर रस्त्यावर झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे येथून लग्नसमारंभ आटोपून पाचोरा येथे परत येत असताना झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सामनाचे जळगाव प्रतिनिधी भरत काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामधील दुर्दैवी बाब ही आहे की मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

wani-family-accident
पाचोरा जवळ झालेल्या अपघातामध्ये वाणी कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या गाडीचा अशा चेंदामेंदा झाला

नांदेड सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुखेड-उदगीर रस्त्यावर जांब गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेून जाणारा टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी झाले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मृतांची नावे
भारतबाई शिवराम कुराडे (६५, रा. लातूर), रुक्मिणीबाई गोरोबा राजे (७०, रा. निटूर), शमा सतार तांबोळी (३८, रा. खरोसा), कस्तुरबाई फुलबांगडीकर (६०, रा. मुरूम), अरुणा शेषेराव नारंगे (४५, रा. लातूर), बाळू लिंगप्पा तिगलमपल्ली (७०, रा. वाघदरी), महानंदाबाई बोडके (४५, रा. खरोसा), स्नेहा सुधीर कुराडे(१०, रा. ममदापुर), सुमनबाई बाळू कुंभार (६५, रा. वाघदरी), तुकाराम बागले (३६, रा. मुरंबी, आयशर चालक)

nanded-accident-eight-peopl
जांब गावाजवळ वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या याच टेम्पोला अपघात झाला

घरी परतत असताना वाणी (अलहीत) परिवाराच्या गाडीचा अपघात झाला.पाचोरा शहरातील दत्त कॉलनीत रहिवासी असलेल्या वाणी (अलहीत) परिवार भाचीचे लग्न आटोपून धुळे येथून मारुती इको गाडी क्र. एमएच १९ सीयू ३९८० ने पाचोऱ्याकडे येत होते.

पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दळवेल गावाजवळ ट्रकने जबरदस्त धडक दिली. या अपघातात बंडू वाणी यांच्यासह त्यांच्या परिवाराचे चार सदस्य जागेवर ठार झाले आहेत. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे इथे हलविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या