किराणा उधार दिला नसल्याने कोंढव्यात दुकानदाराला लुटले

किराणा उधार दिला नसल्याने पाच जणांच्या टोळक्याने दुकानादाराला अडवून कोयत्याने मारहाण करून साडेआठ हजार रुपये काढून घेण्याची घटना मंगळवारी सायंकाळी कोंढवा बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी आशिष ढाकले (रा. गोकुळनगर, कोंढवा), सुरेश दयाळु (रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी) आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशिकेत मारूती कचरे (वय 23, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिकेत यांचे किराणा दुकान असून आरोपी त्यांच्याकडे किराणा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आशिकेत यांनी त्यांना उधार किराणा दिला नाही. त्याचा राग आल्यामुळे पाचजणांच्या टोळक्याने मंगळवारी सायंकाळी आशिकेत कान्हा हॉटेल चौक येथून जात असताना त्यांना अडविले. किराणा माल उधार का दिला नाही, म्हणून त्यांना कोयत्याने मारहाण केली. त्यांच्या खिशातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या