आंध्र प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झालेल्या तेलुगू देसम पक्षाला आणखी मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सहा राज्यसभा खासदारांपैकी चार राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांवेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले.

माजी केंद्रीय मंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे राज्यसभा खासदार वायएस चौधरी, खासदार सीएम रमेश, खासदार टीजी व्यंकटेश यांच्यासह आणखी एका खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर एक खासदाराने प्रकृतीच्या कारणास्तव भाजप सदस्यत्वाचे पत्र स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. या चार खासदारांपैकी वायएस चौधरी आणि टीजी व्यंकटेश पक्षाचे ज्येष्ठ नेते असून चंद्राबाबू यांच्या जवळचे मानले जात होते, परंतु त्यांच्या भाजप प्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी सकाळीच खासदारांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात माहिती दिली होती. या निर्णयासंबंधी टीजी व्यंकटेश यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनीही आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि बीजेवायएमचा माजी सदस्य असल्याचेही व्यंकटेश यांनी सांगितले. तसेच वायएस चौधरी यांनीही भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला.