प्रकल्पग्रस्तांसाठी चांदिवलीत चार हजार घरे! दहिसरमध्येही 108 सदनिका बांधणार

मुंबईतील विविध विकासकामांतील प्रकल्पग्रस्तांसाठी महानगरपालिका चांदिवली गाव येथे तब्बल चार हजार घरे बांधणार आहे. याशिवाय दहिसर आयसी कॉलनी येथील 960 चौ.मी. जागेत 108 घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 1 हजार 611 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. मात्र पालिका विकासकांना त्यासाठी पैसे देणार नसून त्या किमतीच्या व्रेडीट नोट आणि हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर)देणार आहे. यामुळे पालिकेचे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार असून प्रकल्पग्रस्तांना माहुलला जाण्याची गरज लागणार नाही.

प्रकल्पग्रस्तांना पालिकेच्या माध्यमातून माहुलमध्ये घरे देण्यात येत आहेत. मात्र माहुल परिसरातील केमिकल कंपन्यांमुळे या ठिकाणी राहणे कठीण असल्याचे सांगत रहिवाशांकडून आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईतच प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधाव्यात, अशी मागणी नगरसेवकांकडूनही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतच घरे बांधण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये पवई, मरिन लाइन्स, भायखळा, मानखुर्द व दहिसरमध्ये 300 चौरस फुटांची घरे बांधण्यात येणार आहेत. यानुसार प्रकल्पग्रस्तांना मुंबईतच घरे बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. आता प्रत्येक परिमंडळात 5 हजार याप्रमाणे 35 हजार घरे बांधण्यात येणार आहेत.

पालिकेला खर्च नाही, विकासकाला टीडीआर

  • ही घरे बांधण्यासाठी पालिका प्रत्यक्ष पैसे देणार नसून त्या बदल्यात विकासकांना टीडीआर आणि व्रेडीट नोट देणार आहे. या व्रेडीट नोटचा वापर विकासक महापालिकेचे प्रीमियम तसेच इतर शुल्क भरण्यासाठी करू शकेल. तसेच त्यांचे इतरांना हस्तांतरणही करता येणार आहे.
  • यामध्ये डी.बी.एस. रिअल्टी कंपनी चार हजार आणि एम.बी.इंफ्राप्रोजेक्ट ही कंपनी 108 घरे बांधून देणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱया सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. चांदिवली येथील भूखंड पवईपासून हाकेच्या अंतरावर असून दहिसर येथील भूखंडही मोक्याच्या जागी आहे.

अशी बांधणार घरे

  • चांदिवली येथे डी.बी.एस रिअल्टी ही कंपनी 23हजार 405 चौरस मीटरच्या भूखंडावर चार हजार घरे बांधून देणार आहे. या प्रत्येक घरासाठी पालिका 39 लाख 60 हजारांचा खर्च करणार आहे. प्रकल्पावर पालिका 1 हजार 584 कोटी रुपये खर्च करणार असून 5 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार आहे.
  • दहिसर येथे 960 चौरस मीटरच्या भूखंडावर 108 घरे बांधून देण्याची तयारी एम.बी.इंफ्राप्रोजेक्ट या कंपनीने दाखवली आहे. प्रत्येक घरासाठी पालिकेला 29 लाख 70 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. दोन वर्षांत या इमारती बांधून मिळतील.
आपली प्रतिक्रिया द्या