कोरोनाचे नवे स्वरुप.. तपासणी चारवेळा निगेटिव्ह; तरीही शरीरात आढळल्या अँटीबॉडी

1283

देशात कोरोना व्हायरसचे नवे स्वरुप समोर आले आहे. त्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालात दाखल असलेल्या एका रुग्ण महिलेची चारवेळा कोरोना चाचणी करण्यात आली. चारही वेळा चाचणीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. मात्र, पाचव्यावेळी महिलेची अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी आढळल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण झाले असेल तरच त्याच्या शरीरात या अँटीबॉडी तयार होतात. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सात दिवसांमध्ये या अँटीबॉडी तयार होतात. त्यामुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊनही या महिलेच्या शरीरात अँटीबॉडी आढळल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात एक 80 वर्षांची महिला दाखल झाली होती. तिला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. तसेच 15 दिवसांपासून अशक्तपणा जाणवत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी 12 दिवसात चारवेळा तिची कोरोना चाचणी केली. मात्र, प्रत्येकवेळी चाचणी निगेटिव्ह आली. एम्सच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत आरटी-पीसीआरद्वारे या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे त्यातील निष्कर्ष अचूक आहेत. रुग्ण महिलेत कोरोनाची सर्व लक्षणे असूनही चाचणी निगेटिव्ह येत असल्याने डॉक्टरही चक्रावले. मात्र, कोरोनाची लक्षणे असल्याने डॉक्टरांनी महिलेला कोरोना संक्रमित समजून उपचार केले. या उपचारांनी महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर महिलेची अँडीबॉडी चाचणी करण्यात आली.

या चाचणीत महिलेच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी आढळल्या आहेत. त्यामुळे अत्याधुनिक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीलाही कोरोना व्हायरस चकवा देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला म्हणजे तो संक्रमित नाही, असे समजून चालणार नाही. जगभरात कोरोना विविध स्वरूपात आढळला आहे. या महिलेमध्ये आढळलेले हे कोरोनाचे आणखी नवे स्वरुप आहे. सर्व लक्षणे दिसत असूनही चाचण्या निगेटिव्ह येतात आणि शरीरात अँटीबॉडीही आढळतात. त्यामुळे यापुढे ही शक्यता लक्षात घेत रुग्णामध्ये संक्रमणाचे निदान होत नसल्यास पॉझिटिव्ह रुग्णाप्रमाणे उपचार करण्याची गरज एम्समधील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या