इस्रायलमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या हातून साडेतीन हजार वर्ष जुनं मातीचं भांडं फुटलं. त्यामुळे एकच गदारोळ झाला. पण या प्रकरणी म्युझियम प्रशासनाने मुलाच्या पालकावर कुठलीही कारवाई केली नाही ना कुठला दंड आकारला आहे. इतकंच नाही तर मुलाला आणि त्याच्या पालकांना म्युझियम प्रशासनाने एका म्युझियमच्या खासगी टुरवर आंमत्रित केले आहे.
इस्रायलच्या एका वास्तूसंग्रहालयात एक साडेतीन हजार वर्ष जुनं मातीचं भांडं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. या भांड्याच्या बाजूला कुठलीही सुरक्षेची चौकट नव्हती. एका चार वर्षांचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत हे वास्तूसंग्रहालय पहायला आला होता. तेव्हा चुकून त्याचा धक्का लागला आणि हे मातीचं भांडं फुटलं. साडे तीन हजार वर्ष जुनी असलेली वस्तू फुटली म्हणून गदारोळ झाला. पण म्युझियमच्या प्रशासनाने या प्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही.
हे मातीचं भांडं मध्य इस्रायलमध्ये उत्खननावेळी सापडलं. उत्खननावेळी जेव्हा मातीची भांडी सापडतात तेव्हा ती तुटलेली असतात किंवा अर्धवट असतात. पण हे भांडं पूर्ण होतं आणि सुस्थितीत होतं. ऑलिव्ह ऑईल किंवा वाईन नेण्यासाठी आणण्यासाठी या भांड्याचा वापर होत असावा असा अंदाज संशोधकांनी लावला होता. गेली 35 वर्ष हे भांडं या वास्तूसंग्रहालयात होतं.
या मुलाकडून हे भांडं चुकून फुटलं गेलं. तेव्हा हे भांडं दुरुस्त करून पुन्हा प्रदर्शनासाठी ठेवलं जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच ज्या मुलाकडून हे भांड फुटलं गेलं त्यांच्याकडून कुठलीही भरपाई घेण्यात आलेली नाही. या मुलाला आणि त्याच्या पालकांना या म्युझियमच्या खासगी टुरवर आमंत्रित करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगण्यात येत आहे.