मुंबईत अजूनही ओमायक्रोनचा दबा! 230 जणांच्या चाचणीत 100 टक्के ओमायक्रोन, एकाचा मृत्यू

मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असताना चौदाव्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालातील 100 टक्के चाचणी अहवाल हे ओमायक्रोनचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 230 जणांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. या अहवालानुसार ओमायक्रोनमुळे एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा यशस्वीपणे परतवून लावण्यात पालिकेला यश आलेले असले तरी बाधितांमधील नेमक्या उपप्रकाराचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट 2021 पासून जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या करण्यात येत आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीअंतर्गत चौदाव्या फेरीचे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. बाधितांमध्ये नेमक्या उपप्रकाराचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करणे सोयीस्कर ठरण्यासाठी  ही जनुकीय चाचणी करण्यात येत आहेत.

रुग्णांचे वयोगटानुसार विश्लेषण

  • 0 ते 20 कर्षे – 26 (11 टक्के)
  • 21 ते 40 कर्षे – 68 (30 टक्के)
  • 41 ते 60 कर्षे – 60 (26 टक्के)
  • 61 ते 80 कर्षे – 59 (26 टक्के)
  • 81 ते 100 कर्षे – 17 (7 टक्के)

230 चाचण्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण

  • 230 बाधितांपैकी, 74 जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी 19 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली.
  • तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू ओढवला. ज्या रुग्णाचा मृत्यू ओढवला त्याचे वय 43 वर्षे होते. तसेच तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता. लक्षणे गंभीर होऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.