कर्नाटकात 22 हजार कोटींचा प्रकल्प फॉक्सकॉन देणार 40 हजार थेट नोकऱ्या

तैवानचे उत्पादक फॉक्सकॉनने कर्नाटकात तब्बल 22 हजार कोटींचा प्रकल्प दोड्डबळ्ळापूरजवळ उभारला आहे. त्यातून राज्यभरात 40 हजार थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कर्नाटकातील युनिट, चीनच्या युनिटनंतर फॉक्सकॉनचा दुसरा सर्वात मोठा प्लांट बनण्याची अपेक्षा असल्याचे फॉक्सकॉनचे प्रमुख यंग लिऊ यांनी सांगितले.

विशेषतः मध्यमवर्गीय शिक्षित व्यक्तींसाठी संधी असून आमची गुंतवणूक इथेच थांबणार नाही. परस्पर विश्वास असल्यास काहीही साध्य होऊ शकते, असे यंग लिऊ म्हणाले तर फॉक्सकॉनला आम्ही पाणी, वीज आणि रस्त्यांपासून कायदेशीर मदतीपर्यंत सर्व काही देऊ, असे लिऊ यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सुमारे एक लाख लोकांना मिळणार रोजगार

बंगळुरू प्लांट ऍपल गॅझेट्स तयार करणार आहे. कंपनीने कर्नाटक सरकारसह राज्यात 500 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीसाठी करार पत्रावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पात सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. फॉक्सकॉनच्या प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणीसाठी केआयएडीबी, केपीटीसीएल, अग्निशमन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करत आहेत, असे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.