अर्जेटिना भिडणार फ्रान्सला

55

सामना ऑनलाईन,कझान

रशिया येथे सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या साखळी फेरीचा थरार संपला असून आता आजपासून बाद फेरीची रंगत जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळणार आहे. पहिल्याच दिवशी दोन मोठय़ा लढती होणार असून कझान येथे होणाऱ्या लढतीत दोन विश्वविजेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या अर्जेंटिनाचा संघ १९९८ साली मायदेशात जगज्जेता बनलेल्या फ्रान्सचा सामना करणार आहे. तसेच ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ लुईस सुआरेझच्या उरुग्वेला भिडणार आहे.

इतिहास मेस्सी ऍण्ड कंपनीच्या बाजूने

अर्जेंटिना व फ्रान्स या दोन देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांमध्ये फ्रान्सला फक्त दोनच लढतींत विजय मिळवता आला आहे. याशिवाय १९३० व १९७८ साली झालेल्या वर्ल्डकपमधील लढतींतही अर्जेंटिनानेच बाजी मारलीय. एवढेच नव्हे तर मागील चार सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवण्याची करामत करून दाखवलीय. फुटबॉल लढतींचा इतिहास लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या बाजूने असला तरी फ्रान्सने गेल्या सात वर्ल्डकपमधील लढतीत एकदाही पराभवाचा चेहरा पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल. फ्रान्सच्या ऍण्टोन ग्रिझमॅनवरही नजरा असतील.

रोनाल्डो-सुआरेझमधील लढत कोण जिंकणार…

पोर्तुगाल व उरुग्वे यांच्यामध्येही उद्या बाद फेरीची लढत रंगणार आहे. यावेळी ख्रिस्तियानो रोनाल्डो वि. लुईस सुआरेझ यांच्यामधील झुंज तमाम फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण फुटबॉल हा सांघिक खेळ असल्यामुळे संघातील सर्व खेळाडूंचा खेळच या लढतीतील विजेता ठरवेल यात शंका नाही.

फ्रान्सचा प्रमुख खेळाडू
ऍण्टोन ग्रिझमॅन

यांना मिळालेय एक यलो कार्ड
अर्जेंटिना
बनेगा, मार्काडो, मॅसचेरानो, मेस्सी, ऍक्युना, ओटमेण्डी
फ्रान्स
पोगबा, मॅटय़ुडी, तोलिस्सो

अर्जेंटिना या फॉरमेशनने मैदानात उतरणार
४-४-२
फ्रान्स या फॉरमेशनने मैदानात उतरणार
४-२-३-१

आपली प्रतिक्रिया द्या