महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा, 1 कोटींच्या पावत्या गायब

लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सिद्रामअप्पा माणिकअप्पा डोंगरगे यांच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवशंकरअप्पा मलिकार्जुनप्पा बिडवे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून श्रीकांत गायकवाड यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाच्यावतीने मिळणारा निधी व शिष्यवृत्तीची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवणे आवश्यक होते. परंतू सन 2019-20 मध्ये ती राष्ट्रीयकृत बँकेमधून नागरी सहकारी बँकेत वर्ग करण्यात आली. तब्बल 1 कोटी रुपयांच्या निधीच्या पावत्याही महाविद्यालयात आढळून आल्या नाहीत. 9/9/2022 पासून माजी प्राचार्य सिद्रामप्पा डोंगरगे हे महाविद्यालयात गैरहजर आहेत. ठेवीच्या पावत्या बँकेत जमा केल्याचे त्यांनी तोंडी सांगीतले. प्रत्यक्षात बँकेत ठेवीच्या पावत्या नसल्याचे बँकेतून सांगण्यात आले.

महाविद्यालयाचे बिंदू नामाचे मुळ रजिस्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडे तपासणीसाठी पाठवल्यानंतर विभागीय आयुक्त मागसवर्ग कक्ष संभाजीनगर यांच्याकडून तपासणी केलेली बिंदू नामावलीचे मुळ रजिस्टर अद्यापही जमा केलेले नाही. त्यामुळे प्राध्यापकांचे नुकसान होत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माजी प्राचार्य सिद्रामप्पा डोंगरगे यांच्याविरुध्द भादवी कलम 379, 406, 409, 420, 467, 438, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.