पुरवठा अधिकाऱ्याकडून कोट्यावधीचा गहू गायब; शिवसेनेचे पुराव्यानिशी आरोप

38

सामना प्रतिनिधी । बीड

बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके याला दोन दिवसांपुर्वीच लाच घेतांना रंगेहात पकडले. लाचखोर शेळकेचे एक एक कारनामे आता बाहेर येऊ लागले आहेत. राखीव महिन्याचा चौदा हजार क्विंटल गहू काळ्या बाजारात विकल्याचे पुरावे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत. एवढेच काय या अधिकाऱ्याने फेब्रुवारी महिन्याचा पूर्ण साठाही गायब केल्याचे आपल्या आरोपात शिवसेनेने उल्लेख केला आहे.

१ लाख रुपयांची लाच घेतांना भ्रष्ट अधिकारी नरहरी शेळके याला रंगेहात पकडल्यानंतर भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन शेळकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांचे पाळेमुळे खोदून काढण्याची मागणी केली आहे. नरहरी शेळके यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा राखीव एक महिन्याचा १४ हजार पाचशे क्विंटल गहू आणि इतर अन्न धान्य साठा संबंधित अधिकारी, गोदाम व्यवस्थापक, तहसीलदार यांच्या संगनमताने गायब केला आहे. त्याशिवाय एपीएल शेतकरी धान्य योजनेअंतर्गत येणारा फेब्रुवारी महिन्याचा धान्य साठा परस्पर काळ्या बाजारात विक्री केला आहे. धान्य माफियांचाही यात सहभाग आहे. धान्य वितरण दुकानदाराचे चलन, परमिट, ईपॉस मशिनवरील फेब्रुवारी, मार्चच्या मालाचा ऑनलाईन डेटा या सर्व कागदपत्रांची चौकशी करुन पुरवठा खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची साखळी आणि धान्य माफियांचे पाळेमुळे शोधण्याची मागणी शिवसेनेने केली. या गैरव्यवाहार प्रकरणी चौकशी न झाल्यास शिवसेना संपुर्ण जिल्हाभरात तीव्र आंदोलन करू असा इशाराही जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या