धक्कादायक! शेतीच नसताना गारपीट आणि फळबाग अनुदान लाटले

55

सामना प्रतिनिधी । लातूर

शेतीचा साधा एक तुकडाही नसताना गारपीट आणि फळबाग अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. २०१४-१५ मधील गारपीटचे अनुदान आणि सन २०१५-१६ मधील फळगाव अनुदान वाटपात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात तक्रार करुनही चौकशी मात्र कासवगतीने सुरू असून या प्रकरणी खरे तर फौजदारी गुन्हे तत्काळ दाखल करण्याची आवश्यकता असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अहमदपूर तालूक्यातील मौजे किनगाव महसूल मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये २०१४-१५मध्ये गारपीट झालेली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना गारपीटचे अनुदानही वाटप करण्यात आले परंतु ज्यांना शेतीच नाही अशा काही जणांना अनुदान वाटप झाल्याचे निदर्शनात आले. या संदर्भात तक्रार करुनही तातडीने कारवाई केली जात नाही अशी तक्रार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जगन्नाथ काशीनाथ पुणे रा. सोनखेड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बनावट शेतकरी संगमेश्वर उमाकांत रा.कोपरा ता. अहमदपूर यांना २७००० रुपये गारपीटचे अनुदान वाटप करण्यात आले. मुळातच तो भुमिहीन आहे. मानखेड ता. अहमदपूर येथील अर्चना मनोहर वाघमारे ही पण भुमिहीन आहे परंतु तिला शेतकरी दाखवून १३५०० रुपये अनूदान वाटप करण्यात आले आहे. सताळा ता.अहमदपूर येथील राम गणपती कोटंबे या भूमिहीन व्यक्तीसही शेतकरी दाखवत २७००० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

फळबाग अनुदान वाटप करतानाही भुमिहीन असणाऱ्यांना अनूदान वाटप करण्यात आलेले आहे. किनगाव येथील संगमेश्वर उमाकांत या भुमिहीन व्यक्तीस २०२५० रुपयांचे फळपिक अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. किनगाव व दगडवाडी येथील कोरडवाहू शेतकरी शिवानंद रेवणप्पा चावरे यांना गारपीटचे अनूदान २७००० रुपये आणि बागायत फळपीक अनुदान १३६०० रुपये वाटप केले गेले. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्याकडे तक्रारी करुनही संबंधितांवर कारवाई केली जात नाही. संपूर्ण अनुदान वाटपाची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या