हा पहा कुंर्झे ग्रामपंचायतीचा ‘विकास’, विहीर दुरुस्तीत ‘स्मार्ट’ घपला

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । विक्रमगड

विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे ग्रामपंचायतीने चांगली विकासकामे केली म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्रदिनी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते स्मार्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार देण्यात आला. मात्र एक वर्षाच्या आतच येथील विकासकामांचा फुगा फुटला आहे. गवळी पाडा येथील जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी मंजूर झालेले ७२ हजार ३८५ रुपये सरकारी लालफितीने हडप केले असून हाच का स्वच्छ कारभार, असा सवाल विचारण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विक्रमगड तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. माता-भगिनींना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून गौरीपाडय़ातील जुनी विहीर दुरुस्त करण्याच्या कामासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे पाऊण लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात विहिरीची दुरुस्ती तर झालीच नाही. केवळ एका बोअरवेलचे काम सुरू असताना तेथील सिमेंट या विहिरीच्या भोवती टाकण्यात आले. तात्पुरती मलमपट्टी करून ग्रामस्थांची फसवणूक केली असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी केला आहे.

गवंडी काम येत नाही तरीही मजुरी दिली
विक्रमगडच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे या विहिरीच्या दुरुस्तीबाबत तक्रार करण्यात आली. मात्र विस्तार अधिकारी एम.एम. सपकाळे यांनी चौकशी पूर्ण केलीच नाही. विहीर दुरुस्त करण्यासाठी ज्या मजुराला गवंडीचे काम करताच येत नाही त्याच्या नावे १५ दिवस मजुरी दिल्याची नोंद कागदोपत्री करण्यात आली आहे.