पेट्रोलपंप विकण्याच्या आमिषाने साठ लाखांचा गंडा; मोहोळ तालुक्यातील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

पेट्रोलपंप विकावयाचा आहे म्हणून दोघांची 60 लाखांची फसवणूक केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे घडली आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनश्री शिंदे, दत्तात्रय शिंदे (रा. हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आह़े  याप्रकरणी प्रवीण टेळे व स्वप्नील मुत्तूर (रा. रविदीप अपार्टमेंट, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

सावळेश्वर हद्दीत शिंदे दाम्पत्याचा प्रियांका पेट्रोलपंप असून, हा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून मंजूर करून घेऊन डिलरशिपमध्ये चालविण्यास मिळाला आहे, असे टेळे व मुत्तूर यांना सांगितले. आर्थिक अडचणीमुळे तो पंप चालविण्यास जमत नसून तो विक्री करावयाचा आहे, असे त्यांना सांगितले. त्यानुसार टेळे व मुत्तूर यांनी पंप विकत घेण्यासाठी 15 महिन्यांत प्रत्येकी 30 लाख असे 60 लाख शिंदे दाम्पत्याला दिले.

पंप चालवण्यासाठी घेतल्यानंतर धनश्री शिंदे यांच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सोलापूर या खात्याचे रजिस्ट्रेशन कंपनीकडे असल्यामुळे डिझेल व पेट्रोलचा लोड मागवण्यासाठी कंपनीसाठी पैसे भरूनदेखील सहकार्य केले नाही. त्यामुळे दिलेले पैसे माघारी मागितले असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. ही घटना दि. 5 मे 2018 ते दि. 25 जुलै 2019 या काळात घडली असून, तेव्हापासून आत्तापर्यंत सतत पैसे परत मागून शिंदे दाम्पत्याने दिले नाहीत. त्यामुळे पैसे घेऊन पंप न देऊन फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.