संयुक्त भागीदारीमध्ये एक बांधकाम कंपनी सुरू करू व त्या माध्यमातून इमारत विकासाची कामे घेऊ, अशी बतावणी करून चौघांनी घाटकोपर येथील धवन कुटुंबाला कोटय़वधीचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपरच्या विद्याविहार परिसरात राहणारे संजय धवन व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे. धवन यांच्या तक्रारीवरून पुंजालाल दवे, देवांग दवे, मौलिक दवे आणि जयसिंग दवे अशा चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय धवन यांच्या तक्रारीनुसार पुंजालाल दवे व अन्य तिघांनी धवन तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपण सयुंक्त बाधकाम कंपनी सुरू करू, असे म्हटले होते. त्यावर दोन्ही बाजूकडून एकवाक्यता झाल्यावर कंपनी सुरू करण्यासाठी संजय धवन यांनी साडेतीन कोटी दिले. संजय यांचे वडील, भाऊ यांनीदेखील पैसे दिले. मात्र दवे याने चालबाजी करत ती रक्कम कंपनीच्या नावाऐवजी स्वतःच्या बँक खात्यावर घेतली. असाच प्रकार धवन यांच्या कुटुंबीयांसोबतदेखील केला. दरम्यान पैसे देऊनही कंपनीचे काम होत नसल्याने धवन यांनी त्यांचे पैसे परत मागितले. त्यानुसार दवे याने तीन कोटी 29 लाख संजय धवन यांना परत केले. त्यानंतर संजय धवन यांनी आरोपींच्या अन्य प्रकल्पामध्ये तीन कोटी 91 लाख रुपये गुंतवले, पण ना ती रक्कम परत मिळाली ना त्या मोबदल्यात काही हाती लागले. दवे यांनी रूम द्यायचे आश्वासनदेखील पूर्ण केले नाही. दहा वर्षांपूर्वीचा हा व्यवहार असून दवे यांनी घोर फसवणूक केल्याची संजय धवन यांची तक्रार आहे.