पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शनच्या नावाखाली उसगावांत महिलांची फसवणुक, ग्रामस्थांच्या सहकार्याने 6 आरोपीना अटक

भारती शिपर्याड या जहाज बांधणी क्षेत्रातील जागतिक कंपनीच्या दापोली स्थित दाभोळ जवळच्या उसगाव गावात पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शनच्या नावाखाली महिलांची फसवणुक करत त्यांच्याकडून 4000 रक्कम घेवून पोबारा करणा-या संशयीत आरोपींना ग्रामस्थांनी पकडून दाभोळ सागरी पोलिस ठाण्याकडे हवाली केल्याने फसवणुक करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

दापोली तालुक्यातील उसगाव या गावात जिल्हा बाहेरील काहींनी पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन मिळून देतो, त्यासाठी उसगावातील महिलांकडून प्रत्येकी 500 रूपयाप्रमाणे 4000 हजार रूपये जमा करून या गावातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र उसगावातील कौस्तुभ वैदय आणि सरपंच मृदुला मिलिंद गोयथळे या दोघांनी माजी उपसरपंच मिलिंद गोयथळे तसेच सुदेश चव्हाण यांना फोन करून आपल्याकडे काही लोक आपल्या लोकांची फसवणुक करून गॅस कनेक्शनच्या नावाने 500 रूपये घेऊन पलायन केल्याचे माजी उपसरपंच मिलिंद गोयथळे यांना फोनवरून सांगितले. तेव्हा लगेचच मिलिंद गोयथळे यांनी त्यांचा पाठलाग करत पंचनदी तारेचा खांब येथे स्काॅर्पिओ गाडीला ओव्हरटेक करत त्यांना पकडले. तसेच मळे येथील सुनिल फिलसे यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी मळे येथील वारेबुवा येथे काही आरोपींना पकडल्यानंतर मिलिंद गोथळे,अनिकेत शेवडे यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांना फोन करून याबाबत माहीती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी पोलीस व्हॅन आणि पोलिसांची कुमक पाठवली. त्यावेळी ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयीत आरोपिंना पोलिसांच्या ताब्यात दिले. सुनिल फिलसे, राजेंद्र बाबु आदावडे, प्रविण पांदे,गणेश आग्रे, गुंडया सुर्वे, अनिकेत शेवडे, कौस्तुभ वैदय,सुदेश चव्हाण पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, निलेश खोपटकर आदीनी याकामी सहकार्य केले. याबाबतची दाभोळ पोलीस ठाण्यात उसगावच्या रहीवाशी आणि उसगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व विदयमान ग्राम पंचायत सदस्य ऐश्वर्या गणेश आग्रे यांनी आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारी नुसार संगिता मोहन पवळे ( नालंदा इंदिरा गांधी काॅलेजच्या पाठीमागे , ता.जि.नांदेड), सुनिता बदु बादावत ( बरांज तांडा, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर),ममता श्रीकृष्ण डोंगरे ( आपकी रोड, शिवपार्वती अपार्टमेंट, ता. जि.अकोला), अशोक पांडूरंग जोगदंड ( एच.पी. पेट्रोल पंपाचे पाठीमागे, नगर रोड रा. हाटा फाटा, ता.जि.बीड), शामसुंदर वैजीनाथ जोंजाळ ( पोलिस पेट्रोल पंपाजवळ बालेपीर ता. जि.बीड) आणि विठ्ठल लिंबाजी सलगर ( कंडक्टर काॅलनी वाघाला, ता. परळी वैजना जि.बीड) या 6 संशयीत आरोपीं विरोधात कलम 419,420,465,468,471,170 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचा अधिक तपास हा पोलीस करत आहेत. उसगावातील ऐश्वर्या गणेश आग्रे, प्रतिक्षा प्रकाश टेमकर, सुवर्णा संतोष टेमकर, लक्ष्मी नारायण धोपट, नयना संकेत टेमकर, मंजुळा यशवंत धोपट, प्रतिभा प्रमोद टेमकर, वैशाली वसंत थोरे सर्व राहणार उसगाव गणेश वाडी या 8 महिलांकडून प्रत्येकी 500 रूपये याप्रमाणे 4000 हजार रूपये जमा करून पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन देण्याचा बनाव करून या महिला फसवण्याचा ईरादा आरोपिंचा होता. या प्रकारे दापोली एकच खळबळ उडाली आहे.