
लॉरा ओगल्सबी ही 48 वर्षांची महिला अमेरिकेतील मिसुरी भागात राहाते. तिला 22 वर्षांची मुलगी असून मुलीचं नाव लॉरेन आहे. लॉराने जवळपास 2 वर्ष मुलीची ओळख वापरून त्याचे फायदे उचलले असल्याचं उघडकीस आलं आहे. 2016 सालापासून तिने हे उद्योग सुरू केले होते. लॉरा पूर्वी आर्कन्सास भागात राहायला होती. मुलीची ओळख वापरून तिने मिसुरीतील चालक परवाना मिळवला होता. परवाना मिळाल्यानंतर ती मिसुरीतच राहायला आली होती. अर्कन्सासमधून मिसुरीत आल्यानंतर लॉराने आपण लॉरेन असल्याचं भासवायला सुरुवात केली होती.
लॉराने लोकांना आपण 22 वर्षांच्या असल्याचं सांगत एका विद्यापीठातील ग्रंथालयात नोकरीला असल्याची थाप मारली होती. तरुण असल्याचं लोकांना सांगतानाच तिने काही तरुण प्रियकरही मिळवले होते असं सांगण्यात येत आहे. लॉरेन असल्याचं लोकांना सांगत लॉराने 25 हजार डॉलर्सचे कर्ज केले आहे. हे कर्ज तिच्या मुलीच्या नावावर असल्याने तिला याचा ताप होणार आहे. लॉराला पोलिसांनी पकडलं असून तिला 17 हजार 521 डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. याशिवाय तिला 5 वर्ष तुरुंगात घालवावी लागणार आहेत.