सायबर ठगांच्या टोळीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बनून सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आभासी न्यायदालन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर ठग एवढय़ावरच थांबले नाहीत, तर बनावट व्हर्च्युअल न्यायालयात बोगस सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत सुनावणी घेऊन खोटा निकाल देत वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस. पी. ओसवाल यांना सात कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. धक्कादायक म्हणजे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे नकली आदेशही काढण्यात आला. सुनावणी अस्सल वाटावी अशी कागदपत्रे आणि कोर्टाचे शिक्केही त्यासाठी तयार करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट व्हर्च्युअल सुनावणी- प्रकरणी लुधियाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव रचत सायबर ठगांच्या टोळीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुमचे नाव आले आहे. त्याची आम्ही चौकशी करतोय, तुमच्या अटकेचं वॉरंट पण निघाले आहे, असे सांगत प्रसिद्ध कापड उद्योगपती एस. पी. ओसवाल यांना घोळात घेतले. त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी निघालेली बोगस नोटीसही अगदी सुप्रीम कोर्टाच्या सहीशिक्क्यानिशी ओसवाल यांना दाखवण्यात आली. ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग करून बनावट पासपोर्ट व डेबिट कार्डसह मलेशियामध्ये पार्सल पाठवणे आणि अटकेची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याचाच आधार घेत सायबर ठगांच्या टोळीने स्काइप कॉल करून सर्वोच्च न्यायालयाची बोगस सुनावणी घेतली.
काय म्हणाले ओसवाल…
स्काईपवर जी सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड सुनावणी घेत असल्याचे सांगण्यात आले. पण त्यांचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. पण त्या व्यक्तीचे बोलणे आणि मेजावर लाकडी हातोडा आपटणे मला ऐपू येत होते. सुप्रीम कोर्टाची सुनावणी म्हणून मला ईडी, मुंबई पोलीस आदींचे सहीशिक्के मारून ऑर्डर पाठवली.
कसा झाला पर्दाफाश
या सगळय़ा प्रकरणातील काही त्रुटी, संशयास्पद बाबी ओसवाल यांच्या पंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱयाने नजरेत आणून दिल्यावर ओसवाल यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 31 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आल्यावर, लुधियाना पोलिसांनी आसाम पोलिसांच्या सहकार्याने या सायबर ठगांना अटक करून त्यांच्याकडून 5.25 कोटी रुपये परत मिळवले आहेत.
गुवाहाटीतून दोघांना अटक करण्यात आली असून आसाम, प. बंगाल आणि दिल्लीतून सक्रिय असणाऱया या टोळीतील आणखी सात जणांचा शोध सुरू आहे.
स्काईप का@लवरून घेतली बनावट सुनावणी
सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत बोगस आभासी सुनावणीचे नाटकही स्काइप का@लवरून रंगवले. सरन्यायाधीश चंद्रचूड सुनावणी घेत असल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर कोर्टाच्या देखरेखीखालील एका गुप्त खात्यात सात कोटी रुपये भरावेत असे आदेश देणारी सुप्रीम कोर्टाचे ‘शिक्के’ असलेली नकली ऑर्डर देत ती ओसवाल यांना व्हॉटस्अॅपवर पाठविण्यात आली. या प्रकारे ओसवाल यांच्याकडून सात कोटी रुपये उकळण्यात आले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने काढला आदेश
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने काढलेल्या आदेशाची प्रत इतकी चलाखीने बनवली होती की, ती तुम्हाला खरी वाटेल. मी त्यावर विश्वास ठेवून सांगितलेल्या खात्यावर पैसेही ट्रान्स्फर केले. सुप्रीम कोर्टाच्या नावाने आणखीही बनावट कागदपत्रे मला पाठवली. त्यात न्या. धनंजय चंद्रचूड वि. श्री. पॉल ओसवाल असा हा खटला असल्याचे नमूद केले होते, असे ओसवाल यांनी सांगितले.