स्वतंत्र कश्मीरचे फलक झळकवणाऱ्या महेकवर कारवाई नाही

688

जेएनयूमधील हिंसाचारानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या महेक प्रभू या महिलेने स्वतंत्र कश्मीरचा फलक झळकावला होता. याप्रकरणी महेकवर कारवाई करणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कश्मीरमधील सध्या जी अस्थिरता आहे, त्यापासून मुक्ती मिळावी असा त्या महिलेचा फलक दाखवण्यामागील हेतू असेल, तर त्याला राष्ट्रविरोधी कार्य म्हणता येणार नाही, असे देशमुख म्हणाले.

गेट वे ऑफ इंडिया आंदोलनातील फ्री कश्मीरच्या फलकाने साऱयांचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महेक प्रभू हिने माफी मागितली होती. याविषयी अनिल देशमुख म्हणाले, आम्ही प्रभू हिचे व्हॉट्सऍप मेसेज तपासले. त्यामध्ये तिने म्हटले होते की, जम्मू कश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा नाही. विरोधी नेता अटकेत आहे. या परिस्थितीपासून तिला मुक्ती हवी असा तिचा उद्देश होता का. यादृष्टीने तपास केला. या उद्देशात काही वाईट नाही आणि हे जर राष्ट्रविरोधी नाही तर त्याविरोधात कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या