वीज, पेट्रोल आणि सीएनजी देणार मोफत; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

समाजवादी पक्षाने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्या या जाहीरनाम्यात सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जनतेला 22 आश्वासने दिली आहेत. या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आलेली विशेष गोष्ट म्हणजे, एक लिटर मोफत पेट्रोल आणि 6 किलो मोफत सीएनजी. या जाहीरनाम्यानुसार उत्तर प्रदेशात सपाचे सरकार आल्यास दुचाकी मालकांना दर महिन्याला एक लिटर मोफत पेट्रोल दिले जाईल. याशिवाय रिक्षाचालकांना तीन लिटर पेट्रोल आणि 6 किलो सीएनजी मोफत देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 58 विधानसभा जागांवर मतदार मतदान करणार आहेत. यातील बहुतांश जागा पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत.

समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

  • सर्व पिकांसाठी एमएसपी दिला जाईल.
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जातील.
  • 12वी पास मुलांना लॅपटॉप मोफत दिला जाईल.
  • 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन.
  • कारागीर बाजार उभारला जाईल.
  • शेतकऱ्यांना चार वर्षात कर्जमुक्त केले जाईल.
  • उत्तर प्रदेशात कर्जमुक्ती कायदा केला जाईल.
  • 2 एकरपेक्षा कमी शेती करणाऱ्यांना खत मोफत.
  • 25 लाख रुपये आणि शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांचे स्मारक उभारले जाईल.
  • बीपीएल कुटुंबांना वर्षाला 2 सिलिंडर.
  • नागरी रोजगार हमी कायदा केला जाईल.
  • मुलींना केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण.
  • वृद्धांना 18 हजार पेन्शन.