मोकळे आकाश

198

माधुरी महाशब्दे

‘‘जानू, ए जानू’’ प्रेमाच्या हाका जानकीपर्यंत पोहोचत नव्हत्या. तिची चाहुलही लागली नव्हती. प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जानकीने दचकून वळून पाहिले. किती हाका मारल्या तुला? कसल्या तंद्रीत होतीस? चला लवकर नाटकाला जायचंय विसरलीस?’

नाटक? हो नाटकच तर करतोय आपण पंचवीस वर्षे. आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श गृहिणी. का केलं आपण हे सारं? काल संदेशचा लेकाचा मेल आला आणि काहीसं शमलेलं वादळ पुन्हा उठलं मनात. पण थिएटरवर पोहोचताच यामिनी व चित्रांच्या गप्पात सामील झाली. नायिकाप्रधान नाटकातली स्त्री किती कणखर, स्वत:चा अवकाश जपणारी स्वतंत्र स्त्री. आपण का नाही असे वागलो? वाफाळत्या कॉफीची कडवट चव जिभेवर रेंगाळत होती आणि मनात ‘त्या’ प्रसंगाची.

पार्टीला जाऊन आल्यावर किती आनंदात होती ती. आदेशची प्रतिष्ठा, मानमरातब, कौतुक… किती अभिमान वाटला होता. सुखाच्या राशीवर असल्याचा अनुभव. पण त्याखालच्या काट्यांची कल्पनाही आली नाही तेव्हा. ग्रॅज्युएशन झालं आणि अचानक हे स्थळ सुचवलं कुणीतरी… खरं म्हणजे तेव्हा लग्नच करायचं नव्हतं. शिकायचं होतं, करीअर करायचं होतं. पण आईबाबांनी समजावलं, आपल्यालाही भुरळ पडली त्याच्या व्यक्तिमत्त्वाची, हुशारीची, खिलाडूवृत्तीची… मनमोकळा वाटला. लग्नानंतरची नवलाईची वर्षं कशी सरली कळलंच नाही. पाट्र्या, परदेशवारी सारं कसं सुरेख चाललं होतं. उच्चभ्रू समाजाच्या, जीवनशैलीत रुळत चालली होती. पण पार्टीत कटाक्षाने ‘ड्रिंक’ टाळत होती. सॉफ्ट ड्रिंकच घेत होती.

त्या दिवशी ड्रिंक घेतल्यावर थोड्याच वेळात गरगरल्यासारखं होऊ लागलं. बाजूला जाऊन सोफ्यावर पडली. नंतरचं काही आठवलंच नाही. सकाळी जाग आल्यावरही काहीसं गरगरत होतं. प्रयासाने डोळे उघडून बघितल्यावर ताडकन उठून बसली. आपण इथे? डिसूझाचं घर? त्याची बेडरूम? कोसळून पडण्याच्या अवस्थेत कसाबसा वॉश घेतला. बाहेर आली. नोकराने अदबीने टेबलावर ठेवलेल्या चहा व नाश्त्याकडे न पाहता बाहेर पडली. शोफरने तिला घरी सोडलं आणि सलाम ठोवूâन तो परत गेला. आत जावं की नाही अशा संभ्रमावस्थेत काही क्षण उभी होती. स्वत:ची पण मायेच्या शृंखला होत्या पायात, त्या चिमुकल्या जिवाच्या. ‘गृहप्रवेश’ करावाच लागला त्याच्यासाठी.

आदेश, तिचा पती नव्हताच घरात. नसणारच होता. पळपुटा किती दिवस पळेल असा? तासभर शॉवरखाली उभे राहूनही समाधान होत नव्हतं. मग बेडवर झोकून दिलं स्वत:ला.

‘आदेश, यापुढे मी केवळ ‘आई’ असेन. गृहिणी, पत्नी या भूमिका म्हणजे ‘नाटक’ असेल. आपल्यातलं नातं संपलंय. तुमच्या महत्त्वाकांक्षेसाठी माझा बळी दिलात. इतक्या हीन पातळीवर जाऊन. त्याची किंमत मोजावीच लागेल तुम्हाला.’

आदेश टूरच्या निमित्ताने अधिकाधिक बाहेर राहू लागला होता. मुलाचे, संदेशबद्दलचे सारे निर्णय तीच घेऊ लागली होती. मात्र त्याच्यावर कोणताही ताण येऊ दिला नव्हता. संताप, वेदना मनाच्या तळाशी दाबून ठेवून लेकासाठी जगत राहिली. सासू-सासNयांच्या मायेनेही तिला हे बळ दिले होते. संदेश उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. या काळात सासू-सासरे देवाघरी गेले. आता तिला दडपण वाटत होतं, संदेशला ‘ते’ कळले तर? आदेश तसं करू शकेल? पण तस धाडस त्याला झालं नाही आणि अचानक आदेशला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच तो गेला. स्वत:च्याही नकळत तिने सुटकेचा श्वास सोडला.

संदेश तीन वर्षांनी परत आला होता. एकीकडे आनंदाने, अभिमानाने तिचा ऊर भरून आला होता. पण खोल कुठे तरी वेदना होती, दडपण होते. मग दृढनिश्चयाने तिनं आपलं मन संदेशजवळ मोकळं केलं. लेकावरच्या प्रेमावर व विश्वासावर तिनं हे धाडस केलं. संदेशने मायेने तिला जवळ घेतलं. त्या आश्वासक स्पर्शाने ती शांतावली. इतक्या वर्षांचं मनावरचं दडपण नाहीसं झालं.

 

आपली प्रतिक्रिया द्या