फ्रेंच फ्राईज फ्रान्सचे नाहीत, तरीही याच नावाने ओळखले जातात…का? वाचा सविस्तर

फ्रेंच फ्राईज म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. बटाट्याच्या लांबट तळलेल्या, मीठ भुरभुरलेल्या खुसखुशीत सळ्या आपण मिटक्या मारत खातो. त्यात आता चीज, पेरिपेरी असे प्रकारही मिळतात. पण, हे फ्रेंच फ्राईज मूळचे फ्रान्सचे नाहीतच, तरीही या पदार्थाला फ्रेंच हे नाव जोडलं गेलं.

तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे. पण, हो हे खरं आहे. फ्रेंच फ्राईज हे नाव जन्माला आलं पहिल्या महायुद्धानंतर. पण, हे फ्राईज मूळचे एका वेगळ्याच देशाचे आहेत. तो देश चॉकलेट आणि वॉफल्ससाठी प्रसिद्ध असा देश आहे.

तो देश म्हणजे बेल्जियम. बेल्जियम चॉकलेट आणि बेल्जियम वॉफल्स म्हटलं की देखील तोंडाला पाणी सुटतं. पण, या दोन्ही पदार्थांसोबत हे बटाट्याचे फ्राईजही बेल्जियममध्ये मुबलक प्रमाणात मिळत. बटाटा हा मुख्य अन्नपदार्थांपैकी एक असल्यामुळे तिथे बटाट्याचे हे फ्राईजही सहज उपलब्ध होत.

पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटीश, कॅनेडियन आणि अमेरिकन सैन्याचा तळ बेल्जियममध्ये होता. तेव्हा तिकडच्या खानसाम्यांनी त्यांना हे तळलेले फ्राईज तर वाढले. पण, याचं नाव फ्रेंच भाषेत सांगितलं. बेल्जियम सैन्याची मुख्य भाषाही फ्रेंच होती.

झालं, इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिकेच्या सैन्यांना ते फ्रेंच नाव लक्षात ठेवणं जड वाटू लागलं. म्हणून त्यांनी फ्रेंच हेच नाव म्हणून घेत त्यांचं बारसं केलं. हळूहळू हेच नाव प्रसिद्ध होत गेलं आणि लोकांसाठी बेल्जियम फ्राईज फ्रेंच फ्राईज झाले.