स्लोवेनियाच्या झिदानसेकची उपांत्य फेरीत धडक

स्लोवेनियाच्या 23 वर्षीय युवा टेनिसपटू तमारा झिदानसेक हिने मंगळवारी टेनिस कोर्टवर दिमाखदार कामगिरी करीत फ्रेंच ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ती स्लोवेनियाची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली हे विशेष. 85व्या स्थानावरील तमारा झिदानसेक हिने स्पेनच्या पॉला बडोसा हिला 7-5, 4-6, 8-6 अशा फरकाने पराभूत केले आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

नदाल 15व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

13 वेळा फ्रेंच ओपनचा करंडक उंचविणारा गतविजेता राफेल नदाल कारकिर्दीत 15व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. या 35 वर्षीय खेळाडूने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना इटलीच्या जननिक सिनरचा 7-5, 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करून कारकिर्दीत 15व्यांदा फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 2 तास 18 मिनिटांपर्यंत चाललेल्या या लढतीत सिनरने पहिल्या सेटमध्ये नदालला चांगली झुंज दिली. मात्र नदालने अखेर हा सेट जिंकला. त्यानंतर नदालने पुढील दोन सेटमध्ये सिनरला फारसे डोके वर काढण्याची संधी दिली नाही. आता उपांत्यपूर्व लढतीत राफेल नदालची गाठ 10व्या मानांकित अर्जेंटिनाच्या डिएगो स्वार्टजमॅन याच्याशी पडणार आहे. दुसरीकडे ‘नंबर वन’ टेनिसपटू नोवाक जोकोवीच उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टीनी याच्याविरुद्ध झुंजेल. नदाल व जोकोवीच यांनी आपापल्या उपांत्यपूर्व लढती जिंकल्यास टेनिस विश्वातील हे दोन महान खेळाडू उपांत्य फेरीत एकमेकांपुढे उभे ठाकतील.

आपली प्रतिक्रिया द्या