माजी प्र-कुलगुरूंविरुद्ध विनयभंगाची तक्रार, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

61

सामना प्रतिनिधी । नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी विद्यापीठाच्या एम.एड. विभागातील माजी विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पीडितेने तक्रार नोंदविली आहे. विशेष बाब म्हणजे काही वर्षांआधी निवृत्त होऊनही डॉ. पाराशर यांचा दिवसभराचा मुक्काम हा एम.एड. विभागातच असल्याचे समोर आले आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौक येथील एम.एड. महाविद्यालयामध्ये २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये प्रवेश घेतला होता. एम.एड. अभ्यासक्रमात विभाग प्रमुख डॉ. राजेश्री वैष्णव या मार्गदर्शक होत्या. त्यामुळे एम.एड.साठी आवश्यक असणारे प्रबंध तयार करताना पीडितेला वैष्णव यांच्याकडे वारंवार जावे लागत असे. वैष्णव यांच्या कक्षात पीडितेला अनेकदा डॉ. गौरीशंकर पाराशर बसल्याचे दिसत होते. वैष्णव यांनी विद्यार्थिनीची पाराशर यांच्याशी ओळख करून दिली.

प्रथम वर्षाला असताना पाराशर आणि वैष्णव यांनी पीडितेला त्रास दिला नाही मात्र डॉ. वैष्णव २०१६ मध्ये येथील विभाग प्रमुख झाल्यापासून पीडितेला त्रास सुरू झाला. २०१७ हे पीडितेचे शेवटचे सत्र होते. शेवटच्या दिवसामध्ये तिला तिचा प्रबंध पूर्ण करायचा होता. यासाठी ती वैष्णव यांच्या कक्षात गेली. विद्यार्थिनीने प्रबंध पूर्ण करण्याची गोष्ट केली असता वैष्णव यांनी तिला ‘तुझे कुछ नही आता, तू बेवकूफ है’, अशा शब्दात फटकारले. ‘पाराशर सर येथे आहेत. तू जी समस्या असेल ती त्यांना विचार. तू त्यांना खूप आवडते. तू पाराशर सर यांना खूष कर. बाकी मी सांभाळून घेईल’, असे वैष्णव म्हणाल्या. त्यानंतर पाराशर यांनी विद्यार्थीनीला हात लावणे आणि विरोध करताच ओढणी पकडणे असा प्रकार सुरू झाला. अखेर तिने हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. यानंतर विद्यार्थिनीच्या पतीचे विभागप्रमुखांशी भांडणही झाले. मात्र बदनामीच्या भीतीने पीडितेने तक्रार केली नाही. सध्या या विद्यार्थिनीने विद्यापीठातील दुसऱ्या विभागात प्रवेश घेतला आहे. यावेळी पीडितेने पाराशर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या