मैत्रीण

<सागर कारंडे>

आम्ही खूप गप्पा मारतो

 तुमची मैत्रीण? – अनिता दाते

 तिच्याबरोबर फिरायला जाता? – दौऱयांमुळे फिरणं होतंच.

 दोघांच्या फिरण्याचे आवडते ठिकाण? – महाबळेश्वर, चिखलदरासारख्या हिल स्टेशनला आवडतं.

 लांबच्या प्रवासाची तयारी कशी करता? – प्रवासाच्या तयारीतला महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही एकमेकांना फोन करून एकमेकांच्या घरून काय काय आणायचं ते सांगतो. विशेषतः खाद्यपदार्थ कोणी कोणते आणायचे ते ठरवतो. माझ्या आवडीचे वेफर्स, भाजी ती आणते. त्यामुळे बाहेरचं खाणं जेवढं शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न होतो.

 प्रवासातला तिचा आवडता पदार्थ? – फोडणीची दाल-खिचडी.

 प्रवासात एकमेकांबरोबर वेळ कसा घालवता? – खूप गप्पा मारतो. पुढे काय करायचंय, नाटक-सिनेमा या विषयावर बोलतो. एकंदरीत करीयर या विषयावर चर्चा करतो.

 प्रवासाव्यतिरिक्त दोघांचे बाहेर भेटण्याचे ठिकाण? – माझ्या किंवा तिच्या घरी.

 प्रवासातील अविस्मरणीय क्षण? – एकदा आम्ही चिखलदऱयाला गेलो होतो. त्या दिवशी नाटकाचा शेवटचा प्रयोग रात्री ११ वाजता संपला. गेस्ट हाऊसही डोंगरदऱयांत होतं. त्या दिवशी आम्ही सकाळी ५ वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. ती जागा आणि तो दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही.

 प्रवासात भांडण झालं तर काय करता? – प्रवासादरम्यानच नाही, इतर वेळीही आम्ही खूप भांडतो. अगदी छोटय़ा छोटय़ा कारणांवरून आम्ही भांडतो. त्यावेळी फक्त भांडतोच.

 प्रवासात बाहेरचं खाण्यावर किती भर असतो? – घरचं नसेल तर बाहेरचं खावंच लागतं. चाट म्हणजे भेळ, पाणीपुरी असे पदार्थ खायला खूप आवडतात.

 बाहेर खायला जास्त कोणाला आवडतं?– दोघांनाही.

 आतापर्यंतचा दोघांचा सगळ्यात सुंदर प्रवास ? – आम्ही इंदूरला गेलो होतो. तिथे आम्ही दोन दिवसांत सलग पाच प्रयोग केले. त्यामुळे खूप दमलो होतो. दुसऱया दिवशी सकाळी खूप लवकर फ्लाईट होतं. त्यामुळे दुसऱया दिवशी सकाळी आम्ही लवकर एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा कळलं की, फ्लाईट अडीच तास उशिरा येणार आहे. ते अडीच तास आणि फ्लाईटमधले दोन तास आमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले. तेव्हा मला अनिताने माझ्या करीअरसाठी व्यावसायिकदृष्टय़ा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सांगितल्या. त्या सध्या मी आचरणात आणतोय.