मैत्रिण

देवीचे शक्तीरूप भावते…हेमांगी कवी

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा देवीचा उत्सव याविषयी तुझ्या मनात काय संकल्पना आहे?

फक्त धांगडधिंगा, भपकेपणा याऐवजी अशा उत्सवात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, समाजाला शिक्षण देणं यासारखे समाजोपयोगी कार्यक्रमही व्हायला हवेत. अशा गोष्टी झाल्या तर त्या मला नक्कीच आवडतील.

देवी जवळची वाटते की गणपती?

मी नास्तिक नाही, पण मूर्तीपूजा मानत नाही. तरीही मला गणपती आवडतो. लहानपणी मी गणपतीचं चित्र काढलं होतं आणि त्याला पारितोषिकही मिळालं होतं, पण आता एक स्त्री म्हणून देवी मला जवळची वाटते, भावते. कारण लहानपणी देवीच्या सौंदर्याविषयी चर्चा व्हायची पण आता माझं जास्त लक्ष तिच्या हातातल्या सगळ्या शस्त्रांकडे जातं.

तुझी आई आणि आदिमाया यामध्ये काही साम्य वाटतं का? असल्यास कोणत्या प्रसंगात?

नक्कीच. प्रत्येक आई स्वतःसाठी स्पेशल असते तशीही माझीही आहे. माझ्या आईची शिकण्याची वृत्ती आजतागायत आहे. अन्याय सहन करायचा नाही, हा गुण तिच्यात आहे. अन्यायाच्या वेळी त्या त्या वेळी ती बोलली आहे. हे साधर्म्य मला दोघींमध्ये आढळतं. ही गोष्ट तिने आम्हालाही शिकवली आहे.

आई म्हणून तू तिच्याशी कसा संवाद साधतेस?

देवी म्हणून मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन घेतलं. मी राहते तिथली कळव्यामधील टेंबीनाक्याची देवी पाहिली की, तिच्याकडून मला सकारात्मकता जाणवते. ती शक्तीशाली आहे. वाघावर आरूढ आहे. त्यामुळे कितीही मोठा प्रसंग आला तरी त्यातून पार व्हावं, असं मला वाटतं.

सौम्य, तप्त ही देवीची रूपंयापैकी कोणतं रूप अधिक भावतं?

मला सगळीच रूप भावतात, अंबाबाई, सप्तशृंगी , तुळजाभवानी या प्रत्येक रूपाचं काहीतरी सांगणं आहे. त्यामुळे सगळीच रूपं भावतात. टेंबीनाक्याची देवी ही माझ्या जवळची आहे.

नवरात्रीचे रंग फॉलो करतेस का?

हो, करते. लहानपणापासून मला ते आवडतात. कलाकार असल्यामुळे रंगांशी माझा जवळचा संबंध आहे. किती तथ्य आहे माहिती नाही, पण एक मजा, गंमत म्हणून करायला काय हरकत आहे, त्यामुळे मी ते करते.

नऊ दिवस साडी नेसण्याची संधी तू घेतेस का?

हो. नवरात्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं जातं. जे लोक आम्हाला या दिवसांत बोलावतात त्या दिवशीच्या रंगाची साडी नेसून या असे सांगतात. त्यानिमित्ताने आम्ही ही संधी साधतोच.

उपवास करतेस का?

पूर्वी करायची, पण आता सासरी घटस्थापना होत असल्यामुळे सासरच्यांच्या समाधानासाठी आणि त्यांची श्रद्धा आहे म्हणून एक दिवस उपवास करते.

तुझ्या दृष्टीने देवीची उपासना म्हणजे काय?

देवीची उपासना आणि पूजा करणं म्हणजे आपण कोण आहोत हे ओळखणं, अन्याय सहन न करणं. अन्यायाविरुद्धही बोलणं. दुसऱयांवर होणारा अन्यायही सहन न करणं. आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य वेळी वापर करणं ही खरी पूजा, उपासना आहे.