पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना कोपरगाव येथे उघडकीस आली आहे. तब्बल 14 महिन्यांनी हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. अभिजीत राजेंद्र सांबरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर प्रमोद जालिंदर रणमाळे असे आरोपीचे नाव आहे.
अभिजीत सांबरे याचा 28 जून 2023 रोजी कोपरगाव येथे मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी सुरवातीला अकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र अभिजीतची त्याचा मित्र प्रमोदनेच हत्या घडवून आणल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता.
पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
मयत अभिजीत हा 27 जून 203 रोजी नाशिक येथे आर्थिक व्यवहाराकरीता जाणार होता. यावेळी त्याने मित्र प्रमोदला सोबत येण्यास सांगितले. प्रमोद ठरल्याप्रमाणे अभिजीतला भेटला. त्यानंतर प्रमोदने अभिजीतच्या दारुचा व्यसनाचा फायदा घेत त्याला बीपी आणि झोपेच्या गोळ्या मिसळून भरपूर दारु पाजली. यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कोपरगाव येथे घेऊन गेला. तेथे त्याला रस्त्यात टाकून पळ काढला.
अति मद्यसेवन तसेच बीपी आणि झोपेच्या अतिरिक्त गोळ्यांच्या सेवनामुळे अभिजीतचा मृत्यू झाला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.