स्पर्श

284

मैत्रीचं नातं… निभवलं तर खरोखरच निर्मळ… निर्भेळ…! माधुरी महाशब्दे

ग्रॅज्युएशन झालं आणि मितालीने अमेरिकेला जाण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील शिक्षणासाठी, करीअरसाठी /आईवडील दोघेही सुशिक्षित होते. करीअरिस्ट होते. समजूतदार होते. त्या  स्वप्नभूमीकडे आजची पिढी किती वेगाने आकर्षित होत आहे याची जाणीव होती त्यांना. त्यात काही गैरही नव्हतं. पण –

‘‘आमचा विरोध नाहीये बेटा, पण त्या परक्या देशात आपलं कोणीही नाहीये. त्या अगदी अनोळखी देशात, वातावरणात तू राहू शकशील अशी खात्री वाटतेय तुला?’’

‘‘होय आई आणि सुदेश, माझा मित्र आहे तिथे. त्याच्या संपर्कात आहे मी काही दिवस. तिथल्या युनिव्हर्सिटीबद्दल, कोर्सेसबद्दल, ऍडमिशन, परीक्षा याबद्दल माहिती दिलीय त्यानं मला.’’

मितालीनं ऍडमिशनसाठी परीक्षा दिली. पूर्वतयारी केली. पासपोर्ट, व्हिसा… सारी तयारी झाली. जायचा दिवस उजाडला. आईबाबांनी जरा अस्वस्थ मनानेच तिला निरोप दिला. मात्र तसं जाणवू दिलं नाही तिला. उलट धीरच दिला.

विमानतळावर रिसिव्ह करायला सुदेश आला होता. त्याने तीन-चार मुलींसोबत राहायची तिची सोयही करून दिली. दिल्ली, कोलकाता, पंजाब अशा प्रांतांतून आलेल्या त्या साऱया हिंदुस्थानी मुली होत्या.

मितालीने युनिव्हर्सिटीच्या आवारात पाऊल ठेवलं आणि ती भव्य इमारत, विद्यार्थ्यांनी गजबजलेलं तरीही शिस्तबद्ध, शांत वातावरण, वेगवेगळय़ा ऍक्सेंटमधले इंग्रजी संभाषण… त्या नवख्या वातावरणात भांबावून गेली ती.

‘‘मे आय हेल्प यू?’’ मितालीने दचकून वळून पाहिलं. खूप उंच, काळा निग्रो मुलगा होता तो. तिच्याकडे पाहत त्यानं पुन्हा विचारलं, ‘मिस, कॅन आय हेल्प यू?’

क्षणभर तिला कळेना, काय करावं? पण मग तिनं त्याची मदत घ्यायचा निर्णय घेतला. नंतरचे चारपाच दिवस गडबडीतच गेले. तो परत दिसलाच नाही. त्या दिवशी लेक्चर संपल्यावर कॅम्पसमध्ये अचानक दिसला. त्याला थँक्स द्यायला हवेत. त्या दिवशी गडबडीत राहूनच गेलं. त्याच्याजवळ जाऊन ती काही बोलणार तोच तो आधी म्हणाला, ‘‘हॅलो, हाऊ आर यू? अ कप ऑफ कॉफी?’’ तिनं नकळतच मानेनं होकार दिला. कॅण्टीनमध्ये कॉफी घेता घेता कॉलेज, कोर्सेस, प्रोफेसर्स याबद्दल बोलत राहिला. तिनं मग त्याची माहिती विचारली. त्याचा कोर्स, त्याची फॅमिली. स्वतःच्या कोर्सबद्दल, फॅमिलीबद्दल सांगितलं.

‘ओ इंडिया! आय व्हिजिटेड इंडिया वन्स. आय हॅव अ गुड एक्सपिरीयन्स अबाऊट इंडियन्स. आय वूड लाइक टू व्हिजिट अगेन!’

मग अधूनमधून कॉलेजमध्ये त्यांची भेट होत राहिली.

त्या दिवशी लायब्ररीत खूपच उशीर झाला तिला. बाहेर पडली तेव्हा अंधार झाला होता. आता कोणतं वाहन कधी मिळेल या चिंतेत उभी होती. अचानक दोघेजण समोर येऊन उभे राहिले. दारू प्यायलेले. अंतर्बाह्य थरारली ती. रिकामा कॅम्पस, सुनसान रस्ते! भीतीमुळे तोंडातून शब्दही फुटेना. कॅम्पसमधून बाहेर पडणाऱया ‘त्यानं’ ते पाहिलं आणि धावतच येऊन पोहोचला.

त्या भयंकर संकटातून सुटका तर झाली. पण आता घरी कसं जायचं? ‘त्याला’ सांगावं?

‘डोंट वरी, आय विल ड्रॉप यू’ – तो.

त्यानं टॅक्सी हायर केली. त्याच्याबरोबर टॅक्सीत बसताना तिच्या चेहऱयावर चिंता, भीती होती. गप्प गप्पच होती ती. ‘त्यानं’ तिच्या हातावर हलकेच हात ठेवला. तिनं दचकून त्याच्याकडे पाहिलं. आश्वासक, निर्हेतुक स्पर्श होता तो! तिच्या ‘सिक्स्थ सेन्स’ने तो स्पर्श ओळखला होता. तिच्या मनात आलं. लिंग, जात, पात, पंथ, देश यापलीकडे असू शकतं असं नातं, निर्मळ मैत्रीचं!

 

आपली प्रतिक्रिया द्या