डोक्यात हातोडा मारून मित्राची निर्घृण हत्या

22

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जुन्या भांडणाचा राग मनात धरून १४ वर्षीय अल्पवयीन तरुणाने गुलाबचंद महतो (२२) या आपल्या मित्राच्या डोक्यात हतोडा मारून निर्घृण खून केल्याची घटना उरण तालुक्यातील जासई गावात घडली. याप्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कर्जत येथील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

आरोपी उपेंद्र कुमार (१४) आणि गुलाबचंद महतो (२२) दोघेही मित्र जासई येथे भाड्याच्या खोलीत राहात होते. आरोपी हा एका गॅरेजमध्ये तर गुलाबचंद महतो हा एका डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की पिडीत मुलाने आरोपीला मिळालेले ११ हजार रुपयांचे मासिक वेतन लुटल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला होता. या भांडणात गुलाबचंदने उपेंद्रला मारले होते. त्यावेळेला उपेंद्र कुमारच्या डोक्यावर जखम झाली होती.

या मारामारीचा बदला घेण्याचे ठरवत शुक्रवारी दुपारी गुलाबचंद महतो आपल्या खोलीत झोपला असताना उपेंद्र कुमारने लोखंडी हातोड्याने गुलाबचंदच्या डोक्यात १०-१५ घाव घालून त्याचा खून केला. यानंतर उपेंद्र कुमार येथून पळून गेला. ही घटना शेजारील एका टेलरला समजल्यानंतर त्यांनी याबाबत उरण पोलीस ठाण्यात माहिती दिली. उरण पोलिसांनी तपास करून आरोपी उपेंद्र कुमार याला अटक केली. शनिवारी आरोपीला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या बाबत उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या