शिरीषायन – यारी दोस्ती…

>>शिरीष कणेकर

माझ्याकडे गाडी नाही. माझ्याकडे नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी करायला बसलं तर पान अपुरे पडेल. माझ्याकडे मनगटावर बांधतात ते घडय़ाळ नाही. पडल्या पडल्या मी मान तिरकी करून भिंतीवरच्या घडय़ाळात किती वाजलेत ते बघतो. वाटेल ती वेळ वाटते. आयुष्याचा अँगल चुकल्यावर घडय़ाळ बघणाऱया मानेचा अँगल चुकला तर काय मोठंसं? लेखकाचं नाव व त्याची सांपत्तिक स्थिती यांच्यात वितुष्ट का असतं?

एक गोष्ट माझ्याकडे मुबलक आहे. मित्र. हीच माझी संपत्ती. हाच माझा ठेवा. आम्हाला हे नातं कसं आवडतं ते सांगतो. माझा एक मित्र श्रीमंत आहे. (टांग त्याची!) आमच्या समोर तर मुकेश अंबानीच. तीन-तीन गाडय़ा आहेत भाडय़ाकडे! मी त्याला म्हणालो, ‘तुला माहितीच आहे की, कमरेच्या (‘कमर लचके मोरी…’) व पाठीच्या दुखण्यामुळे मला कोपऱयापर्यंतही चालता येत नाही. (आणि मनी तीव्र इच्छा कोणाकोणाच्या कमरेत लाथ घालण्याची. चुकून स्वत:च्याच कमरेत कधी लाथ घातली नव्हती ना?). बरं, जवळपासची अंतरे टाक्सी यायला तयार नसते. काय करायचं?’

‘हात्तेच्या!’ श्रीमंत मित्र म्हणाला, ‘माझी एक गाडी दिवसभर घराखाली नुसती उभी असते. आत ड्रायव्हर माशा मारीत जांभया देत बसलेला असतो. तू घेऊन जा. नो प्राब्लेम. कधी पाठवू सांग. तू हवा तिथं त्याला फिरव.’
‘थँक यू- थँक यू.’ मी पुटपुटलो. माझा मोठा प्रश्न त्याने चुटकीसरशी निकालात काढला होता. यासाठी पैसा लागतो. तो माझ्याकडे नसला तरी माझ्या मित्राकडे होता. एकूण एकच!

मी माझ्या गरजेनुसार फोन केला. पहिली, दुसरी व तिसरीही गाडी उपलब्ध नव्हती. जांभया देत बसणारा ड्रायव्हर एकाएकी अंग झटकून कामाला लागला होता. मला आत बसवून फिरवायला त्याला कमीपणा तर वाटत नसेल ना? इतर ड्रायव्हर्स त्याला फिदीफिदी तर हसत नसतील ना? तू मालकासारखा मागे आत रेलून बस, मी गाडी चालवतो असेही मी म्हणू शकत नव्हतो. कारण मला गाडीच चालवता येत नव्हती. मी कुठं, कोणाकडे व का शिकू? यातलं ‘का?’ महत्त्वाचं. मी कधीकाळी स्वत:ची गाडी विकत घेऊ शकेन असं माझे वडील, आजोबा, पणजोबा यातल्या कोणाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझे पाय पाळण्यात दिसत असले तरी ते मोटारीचे क्लच व ब्रेक दाबताना कधीही दिसणार नाहीत हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. मी सायकल चालवायचो तेव्हा तिलाच ‘शेव्हरलेट’ म्हणून माझे आजोबा तीन-चार पिढय़ांची हौस भागवून घ्यायचे. मी शेजाऱया-पाजाऱयांच्या गाडय़ांना टेकून रुबाबात फोटो मात्र काढून घ्यायचो, …मी मित्राच्या ड्रायव्हरला ‘मला डिकीमधून घेऊन जा’ अशी सुधारित आाफर द्यायला हवी होती का?

जेव्हा महिनाभर त्याच्या तीन गाडय़ांपैकी एकही गाडी उपलब्ध होऊ शकली नाही तेव्हा शांतपणे मी माझ्या मित्राला फोन लावला व म्हणालो, ‘का रे, हरामखोर, कुत्र्या! माज आला काय तुला?’
‘सारी-सारी-सारी’ तो गयावया करू लागला.

‘काय सारी! स्पेलिंग तरी येतं का सारी या शब्दाचं? पैसा आला म्हणजे सगळी अक्कल आली का रे? तुझ्याच गाडीखाली चिरडीन तुला मी.’ शब्दांचा फोलपणा कळला तेव्हा कामाठीपुऱयातदेखील शरमेनं काळवंडतील अशी मी शिव्यांची भेंडोळी सोडली.
आता गंमत बघा हं. तो श्रीमंत, मी गरीब, तो गाडीवाला, मी याचक. या नात्यानं कोणी कोणाला शिव्या देणे समाजाला मान्य आहे? पण मैत्रीत असं काही नसतं. सगळेच समान पातळीवर असतात. कोणीही शिव्या द्यायच्या, कोणीही ऐकून घ्यायच्या. ये दोस्ती हम नही छोडेंगे…

दुसऱ्या दिवशी तो स्वत: गाडी घेऊन माझ्याकडे आला. ‘चल रे डुकरा’ तो खालूनच ओरडला.
‘मी ड्रायव्हरच्या शेजारी बसत नसतो. मागे बसतो.’ मी त्याच्या शेजारी बसत म्हणालो.
[email protected]