कर्नाटकातील जेलमधून…गँगस्टार युसूफ बचकानाची व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

कर्नाटकातील बेल्हारी जेलमध्ये असूनही आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे घाटकोपर येथील एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागणारा गँगस्टर युसूफ बचकाना याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. युसूफ पूर्वी गँगस्टर रवी पुजारी याच्यासाठीदेखील काम करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मे महिन्यामध्ये युसूफ बचकाना याने आंतरराष्ट्रीय कॉल करून मुंबईतील एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाकडे 50 लाख खंडणीची मागणी केली होती, मात्र या व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिला होता. तेव्हा ‘घर मे छोकरे लोक घुसेंगे, फटाके फोडेगे तबी तेरे को अच्छा लगेगा’ असे धमकावले होते. यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. याची दखल घेत खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तरळगट्टी, एपीआय सुनील पवार, अरुण थोरात, उपनिरीक्षक देशमुख, लेम्भे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करून खंडणीसाठी धमकावणारा युसूफ बचकाना हा एका हत्येच्या गुन्ह्यात कर्नाटकातील बेल्हारी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी बेल्हारी कारागृह गाठून युसूफ बचकाना याला पकडून मुंबईत आणले. त्याला कोर्टात हजर केले असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

प्रतिसाद न मिळाल्यानंतर हस्तकांकडून धमक्या

बांधकाम व्यावसायिकाने युसूफ बचकाना याच्या धमक्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे युसूफच्या मुंबईतील हस्तकांनी लॅण्डलाइनद्वारे व्यावसायिकाला धमकावले होते. युसूफ बचकाना याने याआधी दाऊद, छोटा राजन, छोटा शकील, रवी पुजारी यांच्यासाठी काम केले आहे. खंडणीविरोधी पथक बचकानाकडे अधिक चौकशी करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या