पोलीस स्थानकासमोरच पीडित महिलेचा ‘रुद्रावतार’, पतीवरचा राग गाडीवर, चक्क फावड्याने फोडल्या काचा

चिपळूण शहरातील एका दाम्पत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येऊन शनिवारी सायंकाळी एक फिल्मी स्टाईल ड्रामा पाहायला मिळाला. पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलेने चक्क पोलीस स्थानकासमोरच फावड्याच्या सहाय्याने त्याच्या गाडीच्या सर्व काचा फोडत आपला राग व्यक्त केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक घटनेने पोलीस स्थानकासह नागरिकही हादरले. पीडित महिलेच्या या रूद्रावताराने शहरात एकच खळबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला गरोदर आहे. पतीकडून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा तिचा आरोप आहे. तसेच त्याने आपल्याला यापूर्वी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचेही तिचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार देण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी ती गेले काही दिवस पोलीस स्थानकाच्या चकरा मारत आहे. शनिवारीही ती पोलीस स्थानकात आली होती. तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि काही नातेवाईक मंडळीही होती. याचवेळी सायंकाळच्या वेळेत तिचा पती व सासू कारने तेथे आले. पतीने पोलीस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर आपली अलिशान कार उभी केली होती. न्यायासाठी गरोदरपणात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आणि पतीपासून होणारी असह्य मारहाण यातून अक्षरशः वैतागलेल्या त्या महिलेला आपला राग अनावर झाला. तिने गाडीच्या दिशेने धाव घेत फावड्याच्या सहाय्याने कारवर हल्ला करत सर्व काचा फोडल्या. या प्रकारामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन नागरिकही चक्रावले. गाडीचे नुकसान पाहून पती व सासूनेही डोक्याला हात लावला. तिचा पती वकील असल्याचे बोलले जात असून चिपळुणातील सुशिक्षित कुटुंब असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. तर पीडित महिलाही पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यावर ठाम होती. तिने याबाबतची व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडताच पोलिसांमार्फत पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.