हिंदुस्थानसमोर साखळी फेरीचा अडथळा

32

सामना ऑनलाईन | मुंबई

हिंदुस्थानात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. यजमानपद भूषवत असल्यामुळे हिंदुस्थानच्या कुमार संघाला जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धेत सहभागी होता आले. मात्र यावेळी अमरजीत सिंग नेतृत्व करीत असलेल्या हिंदुस्थानच्या कुमार संघासमोर साखळी फेरीतच मोठा अडथळा असणार आहे. त्यामुळे पुढल्या फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे. हिंदुस्थानी संघाचा ‘अ’ गटामध्ये समावेश करण्यात आला असून या गटामध्ये अमेरिका, कोलंबिया व घाना हे तगडे संघ आहेत. याचमुळे यजमान संघाचा वर्ल्ड कपमधील प्रवास खडतर असेल यात शंका नाही.

सांघिक कामगिरी महत्त्वाची

मुख्य प्रशिक्षक लुईस मॅटोस यांनी माझ्याकडे नेतृत्व सोपवण्यात आल्याचे सांगितल्यानंतर आश्चर्य वाटले. पण शेवटी हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, असे मत व्यक्त केले आहे हिंदुस्थानी कर्णधार अमरजीत सिंग याने.

दिग्गज प्रतिस्पर्धी

आफ्रिका खंडातून घाना संघाने, मध्य व उत्तर अमेरिका, कॅरेबियन गटातून अमेरिका व दक्षिण अमेरिकेतून कोलंबियाने वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले आहे. घाना या संघाने दोन वेळा १७ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करुन दाखवलीय. कोलंबियाने दोन वेळा चौथा क्रमांक पटकावलाय. तसेच अमेरिकेच्या सीनियर संघाला फुटबॉलमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चमकदार कामगिरी करता आलीय. यावरूनच हिंदुस्थानसमोर साखळी फेरीतील प्रत्येक लढतीत कडवे आव्हान मिळेल, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या