पुनर्जन्माच्या आशेपोटी गोठवून ठेवलेले अब्जोपतींचे मेंदू आणि मृतदेह घटस्फोटीत बायकोने पळवून नेले

बायकोपासून घटस्फोट घेणं रशियातील एका उद्योजकाला भलतंच महागात पडण्याची चिन्हे दिसायला लागली आहे. दानिला मेदवेदेव (41 वर्षे) याचं आणि वलेरिआ उडालोवा (59 वर्षे) या दोघांचं लग्न झालं होतं. घटस्फोटाच्या खटल्यानंतर वलेरिआ संतापली असून तिने दानिलाच्या कंपनीवर तिच्या कर्मचाऱ्यांसह धाड घातली. या धाडीदरम्यान तिने इंग्लंड आणि अमेरिकेतील अब्जोबती लोकांचे मृतदेह आणि मेंदू आपल्या पळवून नेले असून ते सगळे एका कंटेनरमध्ये भरून ती घेऊन गेली आहे. या अब्जोपती लोकांनी लाखों रुपये खर्च करून आपले मृतदेह, मेंदू जतन करून ठेवले होते. आपला पुनर्जन्म झाल्यास आपला देह आपल्याला परत मिळेल या आशेपोटी त्यांनी आपला देह जतन करून ठेवायला सांगितला होता.

दानिला आणि वलेरिआ यांनी क्रिओरूस नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीची वलेरिआ ही पूर्वाश्रमीची बॉस होती. या दोघांनी लाखों रुपये घेऊन अब्जोपती लोकांचे मृतदेह आणि मेंदू जतन करून ठेवायला सुरुवात केली होती. दानिला आणि वलेरिआ यांच्यातील वादानंतर वलेरिआला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

वलेरिआने मृतदेह नेल्याचं कळाल्यानंतर दानिलाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मृतदेह घेऊन जाणारा कंटेनर पकडला आहे. मात्र वलेरिआ पोलिसांना सापडली नसल्याचं दानिलाचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकारात मृतदेहांचे नुकसान झाल्याचा आरोपही दानिलाने केला आहे.

वलेरिआने या सगळ्या प्रकाराचं समर्थन करताना म्हटलंय की तिला कंपनीतून गैरमार्गाने बाहेर काढण्यात आलं होतं. हे मृतदेह आणि मेंदू ही आपली मालमत्ता असून आपल्या मालकीचं जे आहे तेच मिळवण्यासाठी आपण हे सगळं केल्याचं तिने म्हटलं आहे. काही अब्जोपतींनी त्यांची कुत्री-मांजरंही गोठवून ठेवायला दिली होती. ती देखील वलेरिआने नेल्याचा आरोप दानिलाने केला आहे. मानवाचा मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी दानिला आणि वलेरिआ यांची कंपनी जवळपास 26 लाख 55 हजार रुपये आणि मेंदू जतन करण्यासाठी 11 लाख 23 हजार रुपये शुल्क घेत होती.

आपली प्रतिक्रिया द्या