बनावट दागिने गहाण ठेवून बँका, संस्थांना दोन कोटींचा चुना

59
फोटो- प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, मुंबई

सोन्याचा मुलामा देऊन एकाच पद्धतीचे बनवलेले दागिने गहाण ठेवून विविध बँका व वित्तीय संस्थांना जवळपास दोन कोटी रुपयांचा चुना लावणाऱया सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने गजाआड केले. आरोपींकडून पिवळ्या धातूच्या बांगडय़ा, सोन्याचे पुंदण, चांदीची पावडर, तांब्याच्या पत्र्याचे तुकडे, विविध खडे व बनावट दागिने बनविण्याचे साहित्य हस्तगत केले आहे.

प्रणीत जाधव या सराफाने कोटक महिंद्र बँकेने लिलाव केलेले तीन सोन्याचे पेंडल एक लाख 64 हजार किमतीचे तारण ठेवलेले दागिने विकत घेतले होते पण जाधव यांनी ते 40 ग्रॅम वजनाचे सोने वितळवल्यावर केवळ 5.23 ग्रॅम वजनाचे सोने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जाधव यांनी याबाबत तक्रार केली. जाधव यांच्याप्रमाणे लिलावात सोने विकत घेणाऱयांची देखील फसवणूक झाली होती. त्यामुळे प्रॉपटी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मयेकर, धीरज कोळी, संतोष गायकर, एपीआय सुनील माने, लक्ष्मीकांत साळुंखे, तसेच सुनील कांगणे, आनंदा गेंगे, महिला कॉन्स्टेबल मालवणकर, मुपुंदे आदींच्या पथकाने तपास सुरू केला तेव्हा बनावट दागिन्यांवर सोन्याच्या शुद्धतेबाबत त्रिकोणी मानक चिन्ह असलेले होलमार्क कोरून ते दागिने विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये गहाण ठेवणारी एक टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. त्यानुसार टोळीची सखोल माहिती काढून पोलिसांनी रमेश सोनी, दिनेश सोनी, बिमल सोनी, अनिलकुमार स्वामी, प्रशांत नारायण आणि नितू विलयील अशा सहा जणांच्या मुसक्या आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या