सावंतवाडीत बहरणार ‘फ्रूट ऍण्ड फ्लॉवर’ फेस्टिव्हल

41

सामना ऑनलाईन, दोडामार्ग

ग्रामीण भागातील होतकरू महिला तसेच शेतकऱ्यांना दुर्लक्षित फळे व फुलांपासून प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी सावंतवाडीत ‘फ्रूट ऍण्ड फ्लॉवर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी नगर परिषद आणि सजग नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून हा महोत्सव २८ एप्रिल ते १ मे दरम्यान संपन्न होणार आहे.

या उत्सवास ३० स्टाल असणार आहेत. ‘फिनिक्स’ बेळगाव येथील बायोगॅसवर चालणाऱया काही घरगुती उपकरणांचा स्टाल, मातीचा कुकर, मातीचा फ्रीज व नवी मातीची भांडी योग्य दरात उपलब्ध असणार आहेत. विविध रंगाचा, विविध चवीचा विशिष्ट झाडावरचा मध, स्थानिक वाणाच्या भाताचे, नाचणी, ज्वारी, वरई, भाजीपाला यांचे बियाणे तसेच केसर, केंट, कीट, पालमेर, आम्रपाली जातीचे आंबे, काजूमध्ये वेंगुर्ला ४ व ७, चिकू, मंगल सुपारी, प्रताप जातीची नारळाची रोपेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. वेगवेगळय़ा पदार्थांची चवही या फूड फेस्टिव्हलमध्ये चाखायला मिळणार आहे.

या महोत्सवात पारंपरिक पाककृती आणि फळांपासून बनवलेल्या पाककृती असणार आहेत. सावंतवाडी नगरपालिका आणि सजग नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथे नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत सचिन देसाई यांनी ही माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक बांदेकर, आंनद नेवगी, सरोज दाभोलकर, चैतन्य बांदेकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या