सावधान! फळांचे ज्यूस धोकादायक ठरू शकतात

dr-namrata-bharambe>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

सध्या जर आपण एखाद्या सुपरशॉपमध्ये गेलो तर अगदी सहज उचलली जाणारी गोष्ट म्हणजे पॅकेजड फ्रुट ज्युसेस… अतिशय हेल्दी म्हणून लोक हे आवर्जून घेतात किंवा तारांकित हॉटेलच्या ब्रेकफास्टमध्ये २-३ प्रकारचे ज्यूस असतात. विशेषत: कॅलरी कॉन्शिअस लोकांची त्या ज्युसेसला आवर्जून पसंती मिळते. पण हे फळांचे ज्सूस खरचं आरोग्यदायी आहेत का? तर ”नाही!” फ्रुट ज्यूस हे इतर कोणत्याही शीतपेयांएवढेच अपायकारक आहे.

फ्रुट ज्युसेस हे का टाळावेत याची पुढीलप्रमाणे कारणे देता येतील

१) सुपर मार्केटमध्ये अगदी १००% फ्रेश फ्रुट ज्यूस लिहिले असेल तरी थांबा. विचार करा की तुम्ही कोणतेही फळ कापून ठेवा तरी ते थोड्या वेळात काळे पडते. म्हणजेच तुमच्यापर्यंत फळांचे रस ताजे पोहचण्यासाठी यामध्ये भरपूर प्रमाणात साखर व संरक्षकाचा वापर केलेला असतो आणि या प्रक्रियेत फळांची मूळ चव नष्ट होते. त्यामुळे त्यात कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केला जातो.

२) काही कमी दर्जाचे फ्रुट ज्युसेस तर निव्वळ साखर पाणी व फ्लेवर्स एकत्र केलेले असतात.

३) जेव्हा तुम्ही फ्रुट ज्यूस घेता तेव्हा त्यातला वगळला जाणारा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फायबर किंवा तंतूमय पदार्थ. कारण बहुतांश वेळेला रसातील चोथा गाळून त्यात अजून साखर घालून त्यांचे सेवन केले जाते. जे आरोग्याच्या तसेच डाएटच्या दृष्टीने अपायकारक असते.

४) एक ग्लास फळांचा रस बनविण्यासाठी एकापेक्षा जास्त फळे वापरली जातात. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज घेतल्या जातात.

५) ज्युस घेतल्यानंतर पोट भरल्याची जाणीव ही जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे लगेच थोड्यावेळाने भूक लागते व कॅलरीज इंटेक वाढतो.

६) फ्रुट ज्युसचा एक ग्लास पिल्यानंतर मोठ्या प्रमाणात साखर (fruit sugar + added sugar) रक्तात शोषली जाऊन त्वरीत यकृताकडे पाठवली जाते. जेव्हा यकृताकडे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात साखर (fructose) येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते.

७) फळांचे रस घेतल्यामुळे पोटाभोवती अतिरिक्त चरबी वाढणे, ट्रायग्लिसराईड व कॉलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स इ. चयापचयाशी संबंधित व्याधी होऊ शकतात हे संशोधना अंती सिध्द झालेले आहे.

८) लहान मुलांमधील स्थौल्य हा आजचा अतिशय चिंताजनक विषय आहे आणि फळांचे ज्यूस व अतिरिक्त साखर मिश्रीत पेयांच्या रोजच्या सेवनाने या स्थौल्यामध्ये जवळपास ६०% भर पडते असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

९) किमान प्रमाणात व क्वचित फ्रूट ज्यूस घेणे हे काही व्यक्तींसाठी तितकेसे अपायकारक नसेल पण लठ्ठ, मधुमेही असणाऱ्या व्यक्तींना ते नक्की टाळावेत.

१०) जेवणाच्या त्वरीत आधी किंवा नंतर व जेवणासोबत फळे किंवा ज्यूस घेऊ नये.

११) माझ्या मते तरी निसर्गाने फळांची निर्मिती पूर्ण समतोल राखूनच केलेली आहे म्हणजे फळात असणारा अप्रतिम गोडवा आणि त्यात असणारी साखर योग्यप्रकारे पचण्यासाठी फळात असणारे फायबर! म्हणूनच फळे ही संपूर्ण खा, काही फळे ही सालीसह खा आणि निसर्गाचा मान राखा!!!

भेटूयात पुढील लेखात विविध फळांचे शरीरासाठी होणारे फायदे जाणून घेण्यासाठी.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. dr.namrata25@gmail.com

फोन क्र. ९८२०२१५७९६