
अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन जाब विचारल्याने पत्नीचा खून करुन, प्रेत पूरुन विल्हेवाट लावणारा फरार पती पकडण्यात नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा ) असे आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली ज्ञानदेव आमटे (वय 24, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) हिने पती ज्ञानदेव पोपट आमटे याला अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा राग येऊन पती ज्ञानदेव आमटे याने मारहाण करुन तिला जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह कापडात बांधून घराचे डाव्या बाजुस खड्डा करुन पुरले. शिवाय पोलिसांची लदिशाभूल करण्यासाठी पत्नी रुपाली हरवल्याची खोटी तक्रार दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या, रोहित संतोष मडके (वय 26, रा. फर्काबाद, ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथक गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथक त्याचे शोधार्थ दि.18 नोव्हेंबर 2023 रोजीपासून गुजरात राज्यात गेले. आरोपी वेळोवेळी वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुजरात राज्यातील विविध ठिकाणचे हॉटेल, लॉजेस व टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने, तो कंत्राटी व्यवसायानिमित्त वेळोवेळी बाहेरगांवी जात असल्याचे कारणावरुन पत्नी रुपाली ही त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन वारंवार वाद घालत असे. दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी रुपाली ही कारणावरुन वाद घालू लागल्याने, त्याने रागाचे भरात तिचे नाक-तोंड तसेच गळा आवळून खून करुन, प्रेत घराचे जवळ खड्डयात पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुरले व ती हरवली असल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ संभाजी कोतकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.