भिऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी..

85

सामना ऑनलाईन, नाशिक

कर्जमुक्ती भीक नाही तर तो हक्क आहे आणि हा हक्क मिळविण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, अशी ठाम ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रातील शेतकरी आता रडणार नाही तर सरकाला रडवणार आणि ‘साल्या’ म्हणून हिणवणाऱ्यांची चांगलीच सालपटं काढणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. हे कृषी अधिवेशन ही छोटीशी ठिणगी आहे. पण ती वणवा भडकवू शकते, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी देताच हजारो शेतकऱ्यांनी टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी अधिवेशन स्थळ दणाणून सोडले. येथील गंगापूर रोडवरील चोप्रा सभागृहात आज शिवसेनेचे कृषी अधिवेशन दणक्यात पार पडले. खचाखच भरलेल्या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या शेतकरीविरोधी भूमिकेवर जबरदस्त शरसंधान केले.

नाशकातील कृषी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडली. ते म्हणाले, ‘आम्ही एखादी भूमिका घेतली की तुम्ही सत्तेत आहात की विरोधी पक्षात, असा प्रश्न विचारला जातो. आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष आहे की नाही हेच समजत नाही. आम्ही सत्तेच्या बाहेर होतो त्यावेळी मोठी आंदोलने केली होती. कर्जमुक्तीसाठी मेळावे घेतले होते, ‘देता की जाता’ हे आंदोलन केले होते, दिंडय़ा काढल्या होत्या, सरकारला सळो की पळो करून सोडले होते. आता कालांतराने सरकार बदलले, चेहरे बदलले पण प्रश्न तेच आहेत. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा तेच विषय घेऊन लढलो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री अभ्यासू विद्यार्थी झाले

आताचे मुख्यमंत्री तेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांची भाषा काय होती, आता कर्जमुक्तीवर अभ्यास करायचाय असं ते म्हणतायत. मुख्यमंत्री अभ्यासू विद्यार्थी झाले. पण सत्ता आल्यानंतर भाषा बदलणारी आमची औलाद नाही. सत्ता असली काय, नसली काय आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, शिवसैनिकांशी, गरीबांशी असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

पक्षाचे उंबरठे ठेवलेले नाहीत

कर्जमुक्ती, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पक्षाचे उंबरठे ठेवलेले नाहीत. सगळय़ांनी एकत्र यायला पाहिजे. असे काही नाही की महाराष्ट्रात शिवसेनेचा शेतकरी वेगळा, राजू शेट्टींचा वेगळा, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱयांमध्ये फूट पाडणाऱयांसारखे आम्ही कपाळकरंटे नाही असे सांगून शेतकरी म्हणून मतदान करीत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

तर सरकारवरूनच वरवंटा फिरवू

प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात. समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. आनंद आहे. समृद्धी कोणाला नको असते. पण समृद्धी करणं याचा अर्थ असा नाही की जे थोडंसं समाधानाने जगत असतील त्यांच्यावरती वरवंटा फिरवायचा. अशी समृद्धी येणार असेल तर हा वरवंटा आम्ही सरकारवरून फिरविल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमुक्ती द्या, पूर्ण सत्ता तुम्ही घ्या

‘रडतात साले’ अशा शब्दांत शेतकऱ्यांना हिणवणाऱया रावसाहेब दानवे यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे कडाडले, यापुढे शेतकरी रडणार नाही, तर साल्याची सालपटं काढणार आहे. सांगलीच्या साखराळे येथील विजय जाधव हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी जमा करत आहेत त्यावर ते म्हणाले की, आमच्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन फिरण्याचे दिवस आले आहेत. असे असताना चीड येते ती दुसरीकडे मध्यावधी निवडणुकीचा भाजपचा सर्व्हे चाललाय त्याची. मध्यावधी झाल्या तर आपल्याला किती मते पडतील याचे आडाखे बांधले जातायत. गाडीवरचा दिवा विझला, पण डोक्यातला दिवा विझला नाही असे सांगून ते म्हणाले की, असेच असेल तर कर्जमुक्ती द्या. माझे मंत्री, शिवसेनेचे मंत्री सत्तेतून बाहेर पडतील अन् बाहेरून पाठिंबा देतील.

…तर कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो

आता तूर खरेदीत घोटाळा झाला असं म्हणताय, पण तूरडाळ आयातीतला घोटाळा शोधा. सुब्रमण्यम समितीच्या सूचना बाजूला ठेवणारे गुन्हेगार कोण याचा शोध घ्या, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले. लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वीस बँकेतील पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आता शेतकऱयाच्या खात्यात हे १५ लाख रुपये टाका, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो, असे आव्हानच त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिले.

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई का नाही?

शेतकरी भीक नाही तर हक्काचं मागतोय, नोटाबंदीत त्याने त्रास सहन केला. शेतकऱ्याला आयकर लागत नाही म्हणता आणि अडीच लाख रुपये भरताना त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. जिल्हा बँकांना तुम्ही टाळे लावले, मात्र राष्ट्रीयीकृत बँकांमधून नोटा बाहेर आल्या. या भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

विधानसभेवर धडकणार

शिवसेनेचं हे कर्जमुक्तीचं अभियान आहे, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे हा आमचा निर्धार आहे. शेतकऱयाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, कर्जमुक्ती, समृद्धी यासह शेतकऱयाच्या प्रत्येक प्रश्नाची तड लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे सांगून ते म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना घेऊन विधानसभेवर धडक दिली जाईल. शेतकरी कर्जमुक्त होत कसा नाही? आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बांधावर जाईन, शेतकऱ्यांना भेटेन

शेतकऱ्यांसोबत शिवसेना आहे. मी रडणार नाही तर रडवणार असा निर्धार शेतकऱयाने करावा. आत्महत्येचा विचार मनात आणू नका, घर उघडय़ावर पडणार नाही याची काळजी घ्या असे त्यांनी शेतकऱयांना सांगितले. येत्या जून महिन्यापासून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी स्वतः शेतकऱयांच्या भेटीला पाऊस असला तरी बांधावर जाईन असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारची दळभद्री धोरणं

यापुढे एकतर्फी ‘मन की बात’ ऐकणार नाही. आता शेतकरी बोलेल, त्यालाही मन आहे. ते शिव्याशाप नाही तर आशीर्वाद देतील असे सांगून ‘आम्ही सत्तातुर, शेतकरी चिंतातुर’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला. तुरीचं भरमसाट पीक येणार, युद्धपातळीवर तयारी करा, असा सुब्रमण्यम समितीचा अहवाल होता. केंद्राने तो बाजूला ठेवून तूर आयात केली आणि तूर उत्पादकांवर संकट ओढवलं. शेतकऱयांची अवस्थाच दयनीय झाली आहे. त्याला तूर, कांदा रस्त्यावर ओतावा लागतोय. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढलाय. महागाई वाढल्याने अपेक्षित भावही त्याला मिळणार नाही. याला सरकारची दळभद्री धोरणं कारणीभूत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

देवेंद्रभाऊंना शेतकऱ्यांचा दंडवत!

या कृषी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या वेदना शासनाला कळण्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ या आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या पत्रात प्रिय देवेंद्रभाऊ कोपरापासून दंडवत अशी साद घालत शेतकऱ्याला सरकारची वाटणारी भिती, नैसर्गिक आलेले संकट, कवडीमोलाने विकला जाणारा शेतीमाल याबाबतचे जळजळीत वास्तव मांडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱयांचा आक्रोश कानी पडूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया सरकारला इशारा देतानाच कर्जमुक्त होण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. या पत्राचे यावेळी जाहीर वाचन करण्यात आले. तसेच या पत्रासोबतच  एक प्रश्नावलीही यावेळी देण्यात आली. या प्रश्नावलीतून शेतकऱ्यांना  काही प्रश्न विचारण्यात आले असून याच प्रश्नावलीची प्रतही शेतकऱयांच्या  सहीनिशी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या