उद्योगातून जपलेली सामाजिक बांधिलकी- फनेबिलिटी!

4380

स्वतःचा व्यवसाय सुरू करणं ही एक अतिशय आव्हानात्मक बाब. भांडवल, वेळ, मेहनत या सगळ्यांची गुंतवणूक यात असते. व्यावसायिक जर स्त्री असेल, तर तिची स्वतःची वैयक्तिक आव्हानं असतात. पण, असं सगळं असतानाही अनेक स्त्रिया अगदी जिद्दीने आणि धडाडीने व्यवसाय करतात आणि तो यशस्वीही करून दाखवतात. अशाच काही उद्योजिकांनी व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. या उद्योजिकांना एकत्र आणून त्यांच्यातल्या उद्यमी गुणांचा एक सोहळाच ‘फनेबिलिटी’ नावाने साजरा होतोय आणि तो साजरा करताहेत अभिनेत्री शिल्पा तुळसकर.

शिल्पा तुळसकर हे नाव तसं मराठी आणि हिंदी चित्रपट-मालिका विश्वासाठी नवीन नाही. एक गुणी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख सगळ्यांनाच आहे. पण, अभिनयाव्यतिरिक्त त्या या फनेबिलिटीची धुरा सांभाळण्याचं कामही अगदी उत्तम करतात. जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वी एका उद्योजिका मैत्रिणीने तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाची तयारी करताना शिल्पा यांना ही संकल्पना सुचली. शिल्पा यांच्या अनेक मैत्रिणी या उद्योजिका असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपला व्यवसाय करणाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्यातल्या इतर आघाड्या सांभाळून व्यवसायाकडे वळलेल्या या मैत्रिणींसाठी काहीतरी करावं, या उद्देशाने फनेबिलिटीची संकल्पना राबवल्याचं शिल्पा सांगतात. 2015पासून ‘फनेबिलिटी’च्या साहाय्याने त्यांनी अनेक उद्योजिकांच्या उत्पादनांची प्रदर्शनं भरवली आहेत. वेगवेगळ्या उद्योजिका आपली उत्पादनं या प्रदर्शनामध्ये मांडतात. फनेबिलिटीमधील अनेक जणी अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. अभिनयाचं क्षेत्र सांभाळून त्या उद्योगाच्या जगात भरारी घेत आहेत. यात अभिनेत्री निवेदिता सराफ, पौर्णिमा तळवलकर, मंजिरी ओक यांचाही समावेश आहे.

उद्योजिकांच्या कलागुणांचा सोहळा साजरा करताना फनेबिलिटीकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाते. फनेबिलिटीच्या प्रत्येक प्रदर्शनानंतर सामील झालेल्या सर्व उद्योजिका यथाशक्ती एक रक्कम जमा करतात. ती रक्कम मग सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांना देणगी स्वरुपात दिली जाते. फनेबिलिटीची संकल्पना छोट्या प्रमाणावर सुरू झाली असली, तरी आता हळूहळू ती मोठ्या प्रमाणात वाढवत नेण्याचा मानसही शिल्पा तुळसकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत वांद्रे येथे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान ‘फनेबिलिटी’ हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या फनेबिलिटी प्रदर्शनात सहा उद्योजिकांचा सहभाग आहे. हँडलूम आणि डिझायनर साड्या, पेपर क्विलिंग ज्वेलरी आणि भेटवस्तू, हँडमेड ज्वेलरी, कप केक्स आणि ब्राऊनी, चिकनकारीचे कुर्ते अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या