मराठवाडा विकास मंडळाचा निधी राज्यपालांनीच बंद केला – मुनगंटीवार

32

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पूर्वी वैधानिक विकास मंडळाने रस्ते, सभागृह, स्मशानभूमीतील शेड बांधकाम यासारख्या कामासाठी निधी वाटप केला होता. याबाबत राज्यपालांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. मराठवाडा विकास मंडळाचे काम निधी वाटपाचे नसून, मराठवाड्याच्या विकासासाठीच्या योजनांचे संशोधन करणे आहे, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंडळाला कानपिचक्या दिल्या. राज्यपालांनी या मंडळाला निधी देणे बंद केले असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

अर्थमंत्री गुरुवारी शहरात आले होते. यावेळी मराठवाडा विकास मंडळाला त्यांनी भेट दिली. यावेळी मंडळाने त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे निधी देण्याची मागणी केली. हा निधी कुठल्या कामासाठी लागतो, याचे सादरीकरण सुरू होताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना थांबविले. निधी कशासाठी पाहिजे, असा सवाल करून त्यांनी मंडळाचा निधी राज्यपालांनीच बंद केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. पूर्वीच्या काळात या मंडळाने सभागृह बांधकाम, स्मशानभूतीत शेड उभारणे, रस्ते यांसारख्या कामांसाठी निधी वाटप केला. प्रत्यक्षात मात्र या निधीतून करण्यात आलेली कामे बोगस झाली होती. काही झालेल्या कामांची दुरवस्था झालेली आढळून आली. या सर्व प्रकाराबद्दल राज्यपालांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे मंडळाचा निधी बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाचे काम निधी वाटपाचे नसून, विकासकामाचे संशोधन करण्याचे आहे, असे सांगत त्यांनी मराठवाडा विकास मंडळाला कानपिचक्या दिल्या. संशोधनासाठी मंडळांना १ कोटीचा निधी दिला गेला. हवा असेल तर हा निधी २ कोटी रुपये करतो, असे सांगत त्यांनी मंडळाच्या निधी मागणीला ब्रेक लावला.

आपली प्रतिक्रिया द्या