अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर २ महिन्यांनंतर अंत्यसंस्कार

26

सामना ऑनलाईन । सांगली

पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर तब्बल दोन-सव्वादोन महिन्यांच्या कालावधीनंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आज हा मृतदेह कोथळे कुटुंबीयांच्या हवाली केला.

चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोन तरुणांवर सांगली शहर पोलीस ठाण्याचे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या टीमने थर्ड डिग्रीचा वापर करून जबर मारहाण केली. या मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर या पोलिसांनी पुरावा नष्ट करण्यासाठी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. या प्रकरणाला आज दोन-अडीच महिने होत आले.

आंबोली घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनिकेतचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला, मात्र डीएनए चाचणीसाठी तो कोथळे कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला नव्हता. तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कोथळे कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. येथील सीआयडी विभागाच्या कार्यालयात सीआयडी पोलिसांनी हा मृतदेह एका बंद पेटीत कोथळे कुटुंबीयांच्या हवाली केला. त्यावेळी अनिकेतची पत्नी संध्या, आईवडील, भाऊ असे नातेवाईक उपस्थित होते.

डोळे पाणावले
अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेताना कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर हा मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आला, त्यावेळी परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी एकच गर्दी केली. कुटुंबाचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कुटुंबीय, नातेवाईक, परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अमरधाम स्मशानभूमीत अनिकेत कोथळेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या