शहीद सौरभ फराटे अमर रहे!

पुणे, (प्रतिनिधी)

कश्मिरातील पंपोर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान सौरभ नंदकिशोर फराटे यांच्या पार्थिवावर भेकराईनगर (फुरसुंगी) येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सौरभ फराटे यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. ‘शहीद सौरभ फराटे अमर रहे’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत साश्रुनयनांनी या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद सौरभ फराटे यांचे पार्थिव सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भेकराईनगरच्या गुरुदत्त कॉलनीतील राहत्या घरी आणण्यात आले. त्यांच्या घराजवळ उभारण्यात आलेल्या चौथर्‍यावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
दरम्यान, पहाटे पाच वाजल्यापासून नातेवाईक, मित्रमंडळी, फुरसुंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते. पार्थिव घरी आणताच संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. काही दिवसांपूर्वी येथून गेलेला सौरभ शहीद होऊन परतल्याने कुटुंबीय, मित्र परिवाराने दु:खाने हंबरडा फोडला. सौरभ यांचे पार्थिव पाहून त्यांच्या पत्नीने धाय मोकलून अश्रूंना वाट करून दिली.

सकाळी साडेआठ वाजता घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. घरापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यावर फुलांचे गालिचे, रांगाळ्या काढण्यात आल्या होत्या. या वीर सुपुत्रास अभिवादन करण्यासाठी चौकाचौकात आबालवृद्ध नागरिक, महिलांनी गर्दी केली होती. शहीद सौरभ फराटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वांचेच पाय स्मशानभूमीकडे वळले. प्रत्येकजण वेगाने पावले उचलत, कोणी धावत-पळत स्मशानभूमीकडे जात होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेले नागरिक, घरांच्या गॅलरी-गच्चीमध्ये उभ्या असलेल्या महिला पुष्पवृष्टी करून अभिवादन करीत होत्या. ‘जब तक सूरज चाँद रहेगा, सौरभ तेरा नाम रहेगा…’, ‘सौरभ फराटे अमर रहे…’, ‘भारतमाता की जय…’, ‘वंदे मातरम्!’ अशा घोषणांचा अखंड निनाद दुमदुमत होता.
अंत्यविधीसाठी स्मशानभूमीजवळच्या मोकळ्या पटांगणात चौथरा बांधण्यात आला होता. या चौथर्‍यापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर फुलांचा गालिचा अंथरण्यात आला होता. येथे सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती.

साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. राज्य सरकारतर्फे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणेकरांच्या वतीने महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, हवेलीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्यासह लष्कराच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून शहीद सौरभ फराटे यांना अभिवादन करण्यात आले. ८ वाजून ५२ मिनिटांनी शोकधून वाजवून लष्कराच्या वतीने सलामी देण्यात आली. ९ वाजून ५ मिनिटांनी वडील नंदकिशोर फराटे यांनी शहीद फराटे यांना मुखाग्नी दिला. ९ वाजून ९ मिनिटांनी लष्करातर्फे रायफलींतून तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी संपूर्ण जनसमुदाय स्तब्ध झाला. शांतिमंत्रांचे उच्चारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पाकिस्तान मुर्दाबाद…

शहीद सौरभ फराटे यांच्या अंत्यविधीदरम्यान उपस्थित जनसमुदायाच्या भावना अनावर झाल्या. दहशतवादी हल्ले करणार्‍या पाकिस्तानचा निषेध करताना ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत उपस्थित जनसमुदायाकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित तरुणांच्या तीव्र भावना, गंभीर वातावरणामुळे सर्वांना खाली बसण्याची विनंती करावी लागली.

महाराष्ट्र तुमच्या पाठीशी, मुख्यमंत्र्यांकडून फराटे कुटुंबीयांचे सांत्वन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी फराटे यांच्या घरी जाऊन शहीर जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि शहीद सौरभच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण केले. मुख्यमंत्र्यांना समोर पाहताच ‘माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, आता माझी सून आणि दोन नातींच्या भवितव्याचे काय?’ असा सवाल करत सौरभच्या आईने एकच हंबरडा फोडला. त्यांना धीर देत देवेंद्र फडणवीस यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. शासन सौरभचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काळजी करू नका’ अशा शब्दांत त्यांचे सांत्वन केले.

सौरभ फराटे यांच्या अवघ्या एक वर्ष वयाच्या दोन मुलींना पाहून मुख्यमंत्रीही यावेळी भावूक झाले होते. पालकमंत्री गिरीश बापट, जसलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, शंकरनाना हरपळे, संतोष भाडळे, दत्ता राऊत, अमित गुरव आदी उपस्थित होते.

पाकिस्तानला धडा शिकवा – शिवतारे

देशाच्या सीमेवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यात दररोज जवान शहीद होताहेत, दहशतवादी कारवाया थांबत नाहीत. या देशविरोधी कारवायांसाठी पैसा कोठून पुरविला जातो हे सर्वांना माहिती आहे. याठिकाणी नागरिकांनी दिलेल्या ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा याचीच प्रतिक्रिया आहे. देशाने आणखी किती वीर गमवायचे? असा सवाल करून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर करवाई करून धडा शिकविला पाहिजे, असा संताप राज्यमंत्री शिवतारे यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून योग्य पावले उचलून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा शिवतारे यांनी व्यक्त केली.