शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

34

सामना प्रतिनिधी । नागपूर

शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा दीड वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री ११ वाजता त्यांचे पार्थिव पवनी येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. ‘प्रफुल्ल अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे लावत शहराच्या मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. या मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच दिवे देखील लावले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला. शहीद मेजर प्रफुल्ल यांच्यावर वैजेश्वरच्या घाटावर अत्यंत शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवारी जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये मेजर मोहरकर यांच्या नेतृत्वात नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग सुरू असताना पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. त्यात महाराष्ट्रातील भंडारा येथील सुपुत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि जवान कुलदीप सिंग शहीद झाले. मोहरकर त्यांच्या पश्चात पत्नी अबोली व मोठा आप्त परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या