चाकूर तालुक्यात बुरशीच्या ‘अटॅक’ने तुरीचा ‘खराटा’!

चाकूर तालुक्यात यावर्षी पाऊस काळ जास्त झाल्याने गत दोन वर्षाप्रमाणे तुरीच्या पीकाला बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाला असून तुरीचे उभे पीक मोठ्या प्रमाणात जागेवरच वाळुन जात असल्याने तुरीचा खराटा झाला आहे . हलक्या प्रतिच्या जमीनीवरील तुर पीकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला असून शेतकऱ्यांचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तालुक्यात गत दोन वर्षापासून तुरीला बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव बसत असून उभी तुर जाग्यावरच वाळून जाऊन खराटा होत आहे. त्यामुळे यावर्षी तुरीचे क्षेत्रात प्रचंड घट झाली आहे. तालुक्यात खरीप हंगामात साधारणतः आठ हजार सहाशे दोन हेक्टर जमीनीवर शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतले आहे. तुरीचे पीक जोमात असताना व तुरीचे क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पादन चांगले होवुन चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु यावर्षीही पाऊस काळ जास्त झाल्याने तुरीच्या पीकाला बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाला असून ऐन बहरात आलेले तुरीचे उभे पीक जाग्यावरच वाळुन जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. चांगल्या प्रतिच्या जमीनीतील तुरीच्या मर चे प्रमाण कमी आहे. तर हलक्या प्रतिच्या जमीनीतील तुरीचे नुकसान जास्त आहे. त्यामुळे तालुक्यात तूर उत्पादनावर मोठा परीणाम झाला आहे.

बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभावाने तुरीचे पीक वाळुन जात असल्याने प्रशासनाने पहील्या टप्यातच उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. तालुक्यात शेतकऱ्यांच्या हाती आलेले तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात बुरशीच्या फटक्याने वाळून जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाकडुन वाळलेल्या तूर पीकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान याबाबत तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता प्राथमिक टप्यात बुरशी असेल तर बुरशी रोधक औषधाची फवारणी शेतक-यांनी घ्यावी असे सांगीतले.

कृषी विभागाला बुरशीने बाधीत तुर क्षेत्राची माहीतीच नाही !

दरम्यान तालुक्यात बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभावाने कीती तुर क्षेत्र बाधीत झालेले आहे. याविषयीची माहीती तालुका कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे.त्यामुळे प्रत्येक गावात बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभावाने कीती क्षेत्र बाधीत आहे.याचा सर्व्हे करून उपाययोजनांबाबत शेतक-यांत जनजागृती करण्याची गरज आहे.