शिवभैरव आणि बाप्पाची उपासना संगीतातून – अभिजित पोहनकर

रियाज किंवा एखादा कार्यक्रम सुरू करताना त्याचं ध्यान केल्यावर स्वतःमध्ये शरणागती येणं याला अभिजित महत्त्वाचं मानतो. तो म्हणतो, मी फ्यूझन आर्टिस्ट आहे. कोणतेही राग वाजवताना प्रार्थना करून नंतर सादरीकरणाला सुरुवात करतो. हीच मदत आहे. मदत तो करतो, पण आपणही रियाज केलाच पाहिजे.

> आपला आवडता देव?

गणपती, शंकराचं महाकाल आणि कालभैरव हे रूप.

> त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं?

गणपतीच्या दर्शनाला मी सिद्धिविनायकाला जातो. गणेशोत्सवात घरी दीड दिवसाचा गणपती असतो.

> संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो?

मी साईबाबांनाही खूप मानतो. संकटाच्या वेळी मनापासून साईबाबांची प्रार्थना करतो. आमच्या कुटुंबावर त्यांचे खूप आशीर्वाद आहेत.

> आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय असा प्रसंग?

परवा लंडनला माझा कार्यक्रम होता. बुधवार सकाळपर्यंत मला व्हिसा मिळाला नाही. सगळय़ांनाच थांबावं लागलं. त्यानंतर आम्ही देवाला मनापासून प्रार्थना केली. दोन-तीन तासांत हातात पासपोर्ट आणि व्हिसा आला आणि शुक्रवारी पोहोचलो. फारच अप्रतिम कार्यक्रम माझ्या जीवनातला सादर झाला.

> देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो?

मला जे आवडतं त्यापैकी ८० टक्के गोष्टी मला जीवनात मिळाल्या आहेत. ही त्याचीच देणगी आहे. लोकांचं प्रेम कलाकारांसाठी महत्त्वाचं आहे. माझे जगभरात जे लाड होतात, हवं ते खायला मिळतं.

> आवडत्या दैवताचं कोणतं स्वरूप आवडतं?

शंकराचं महाकाल रूप मला आवडतं.

> त्याच्यापाशी काय मागता?

जे चाललंय ते व्यवस्थित चालू दे. तुझी कृपा कायम राहू दे आणि बरेच वर्षे संगीताची सेवा घडू दे. जगभरात माझी कला सादर करतो. त्याकरिता त्याने आशीर्वाद द्यावा. हे काम असंच पुढे सुरू राहून तेवढी मेहनत माझ्याकडून होवो. लोकांसाठी चांगलं संगीत देता यावं.

> नियमित उपासना कशी करता?

हनुमान चालिसा रोज वाचतो. महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र म्हणतो. मंगळवारी उपास करण्याचा प्रयत्न करतो. मंगळवारी देवपूजा करतो.

आपली प्रतिक्रिया द्या